प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पुनर्वसितांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

आठवडा विशेष टीम―

जलसंपदा राज्यमंत्र्यांकडून विविध विषयांचा आढावा

अमरावती, दि. 1 : मांगीया येथील पुनर्वसितांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांबाबत आढावा बैठक जलसंपदा राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, मांगीया येथील पुनर्वसित नागरिकांना अद्यापही प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र, जातीचे दाखले मिळाले नसल्याची तक्रार आहे. प्रशासनाने अभियान राबवून नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करावे. 1950 पूर्वीचे पुरावे मिळू शकले नाहीत तर अधिनियमातील तरतुदीनुसार स्थळ पाहणी आदी करून दाखले द्यावेत. रस्ते, पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. ठक्कर बाप्पा, मनरेगा, आमदार निधीतून विकासकामे पूर्णत्वास न्यावीत. आवश्यक तिथे निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. पिली पुनर्वसन (मोचखेडा) येथील कामांचा आढावाही त्यांनी घेतला.

शिरजगाव कसबा येथील काही नागरिकांचा शेतातील वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याची तक्रार होती. त्यासंबंधी तहसीलदारांनी तत्काळ तात्पुरती परवानगी द्यावी व त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करून प्रश्नाचे निराकरण करावे. डोमा अतिवृष्टी नुकसानभरपाईबाबत पाठपुरावा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले. नगरपरिषद अचलपूर येथील अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घेण्याबाबत गतीने कार्यवाही राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

000

Back to top button