प्रशासकीय

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने सुचविलेल्या सूचनांवर कार्यवाही करा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 5 : जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीने सुचविलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (P.I.M.C.) प्रकल्प कार्यान्वयन बैठक सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव, सहसचिव दिनेश डिंगळे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती  गजभिये यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी  करण्यासाठी  जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (P.I.M.C.) ने सुचविलेल्या सूचनांबाबत सविस्तर शासन निर्णय काढण्यात यावा. समितीच्या कामासाठी जागा देणे तसेच आवश्यक त्या मनुष्यबळाची नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून या कायद्याचा चांगला प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित रहावे याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रूजावा यासाठी आपण स्वत:ही या कायद्याच्या प्रचार व प्रसार अंमलबजावणी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे मंत्री श्री.मुंडे यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी समिती गठन ते आतापर्यंत समितीने केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती त्यांनी बैठकीत दिली. समितीला लागणारे मनुष्यबळ व कार्यालयीन कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत केली.

००००

Back to top button