आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 9 : श्री क्षेत्र अदासा हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना सर्व सोयीसुविधा मिळण्याच्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पर्यटनासाठी हे क्षेत्र महत्त्वाचे असल्याने येथे ॲडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार असून विविध खेळांसाठीच्या पार्क निर्मितीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.
श्री क्षेत्र अदासा येथील तीर्थक्षेत्र विकासाबाबत सादरीकरण द विदर्भ को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन येथील कार्यालयात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक वनसंरक्षक श्री. पालवे, एनएमआरडीएच्या अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, वास्तुविशारद श्री. भिवगडे तसेच समाजिक वनीकरण विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. केदार म्हणाले की, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रकल्पाची निर्मिती करण्यात यावी. विविध प्रकारचे खाद्यानाचे स्टाल उभारणीच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, विविध पर्यटन योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी येथे सांगितले.
या तीर्थक्षेत्राच्या पर्यटन विषयक विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. त्यामध्ये सर्व विकास कामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या असून अतिरिक्त लागणार निधीसाठी पाठपूरावा करण्यात येईल. असेही श्री. केदार म्हणाले. या ठिकाणी आवश्यक सुविधांची त्याठिकाणी प्राधान्याने तजवीज करण्यात यावी. यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी मनिष भारद्वाज यांनी सादरीकरणाद्वारे क्षेत्राचा पर्यटन विषयक आराखडयाबद्दल अवगत केले. या क्षेत्रात भव्य कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यात येणार असून त्या आतील भागात खेळाचे पार्क व बाहेरील भागात फुटबॉल हॉर्स रायडिंग, 55 हेक्टर जमिनीवर वन्यजीवांकरिता ठेवण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी विविध प्रकारचे वाहने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
विविध प्रकारचे खाद्यान्नाचे स्टाल, पेंचमध्ये सौर उर्जेवर चालणारी नाव आहे त्याच धर्तीवर येथेही तयार करण्याचे ठरविले आहे.स्काय सायकल, मल्लखांब व जिम्नॉस्टिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पेटी झु, एरो स्पोर्ट प्रामुख्याने परदेशात प्रसिध्द आहे ते सुध्दा येथे आणण्याचा प्रयत्न आहे. या आराखाड्यानुसार विकासात्मक योजना राबविल्या तर निश्चितच भाविक व पर्यटकांना हे तीर्थक्षेत्र भावेल, असे त्यांनी सांगितले.