प्रशासकीयब्रेकिंग न्युज

दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन तत्पर

आठवडा विशेष टीम―

नंदुरबार, दि.10 (आठवडा विशेष वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसह समाजातील सर्व नागरिकांना दर्जेदार आरोग्यांच्या सुविधा उपलब्ध करण्यास  शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मोलगी येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीनाताई गावित, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक, कृषि व पशुसवंर्धन सभापती गणेश पराडके, जि.प.सदस्य बाजुबाई किरसिंग वसावे, हिराबाई पाडवी, सी.के. पाडवी, निलूबाई पाडवी, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, उपसभापती विजय पाडवी, माजी सभापती पिरेसिंग पाडवी, दिलीप नाईक,मोलगीचे सरपंच मनोज तडवी, उपसरपंच कृष्णा वसावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड.पाडवी म्हणाले, दुर्गम भागातील  आदिवासी बांधवांच्या आरोग्यांची काळजी  घेण्यासाठी शासन तत्पर असून कोणत्याही रुग्णास उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी सिकलसेल,मधुमेह, उच्चरक्तदाबाची नियमित तपासणी करावी. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त निधी आरोग्य विभागाला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाज वर्षानुवर्षे शेवगा, चिंचेचा पाला व अन्य वनस्पतींचा पाला, फुले व फळे यांचा भाज्या म्हणून आहारात वापर करीत आहे. या भाज्या असल्या तरी त्या मुळात वनौषधी आहे, त्यामुळे अनेक आजारांवर त्या उपायकारक आहे. म्हणून आदिवासी बांधवांनी या रानभाज्यांशी जुळलेली नाळ न तुटू देता त्यांचा परंपरेनुसार आहारात नेहमीच वापर करावा, असे आवाहनही ॲड.पाडवी यांनी केले. या शिवाय आदिवासी बांधवांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असे आवाहन करीत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ.गावीत म्हणाल्या की, प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आजाराची तपासणी ही केलीच पाहीजे. यामुळे आपल्याला कोणता आजार आहे त्वरीत  समजते. याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. गरोदर मातानी आपले नाव प्रामथिक आरोग्य केंद्रात नाव नोंदवले असता त्यांना शासनाकडुन 5 हजार रुपये मिळतात. त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. प्रत्येक रुग्णानी अशा सर्व रोगनिदान शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ.गावीत यांनी यावेळी केले. या शिबीरास मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Back to top button