आठवडा विशेष टीम―
मुंबई दि. 12; आकाशवाणी, दूरदर्शनसह सर्व खासगी रेडिओ वाहिन्यांनी प्राइम टाइममध्ये (महत्त्वाच्या वेळेत) मराठी भाषेतील कार्यक्रमांना प्राधान्याने स्थान द्यावे, मुंबईतील रेडिओवरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा, अशा सूचना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या. दृक श्राव्य माध्यमातील प्रतिनिधींची बैठक आज मंत्रालयात मंत्री श्री.देसाई यांच्या दालनात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह दृकश्राव्य माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, राज्यात मराठी भाषेतील कार्यक्रम सुरु राहणे आवश्यक आहे. आकाशवाणीसह विविध खासगी रेडिओ वाहिन्यांवरील मराठी कार्यक्रमांची संख्या कमी झाली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेक मराठी कार्यक्रम हद्दपार झाले आहेत. या ठिकाणी हिंदी, इंग्रजी कार्यक्रमांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. यापुढे आकाशवाणीने मराठी कार्यक्रमांची संख्या वाढवावी, खासगी रेडिओंनीदेखील किमान दोन तास मराठी कार्यक्रम प्रसारित करावेत, असेही श्री. देसाई म्हणाले.
मराठी वाहिन्यांवरून मराठी कार्यक्रम हद्दपार होत असल्याची बाब माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ही निदर्शनास आणून दिली. यावेळी श्री. देसाई यांनी संबंधित रेडिओ वाहिन्यांना मराठी भाषेतील कार्यक्रम प्राधान्याने प्रसारित करण्याची सूचना केली. सध्या एफएम वाहिनी, एफ एम गोल्ड वाहिनीवरील मराठी गाण्यांचे कार्यक्रम बंद झाले आहेत. काहींचा वेळ कमी करण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदी कार्यक्रमांचे दिल्लीवरून प्रसारण होत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून दिली.
याबाबत सर्व रेडिओ प्रमुख आणि आकाशवाणीच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली जाईल, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी मनोहर पावनीकर ( आकाशवाणी), कपिलकुमार ढोरे ( दूरदर्शन), शीवल देसाई ( रेडिओ सिटी एफ एम), रिमा अमरापूरकर ( रेडिओ मिर्ची), मयुर शिंगटे ( रेडिओ फिवर), संतोष क्षत्रिय ( एच. टी. मीडीया) आदी उपस्थित होते.