आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे 34 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून येत्या 19 एप्रिल 2022 रोजी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
मंडळाच्या हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे मंगळवार, दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हा समारंभ होणार असून सन 2019 मधील कामगार मित्र पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार व गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारर्थींना सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमास कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांच्यासह कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंगल, विकास आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव , कल्याण आयुक्त रविराज इळवे यांची उपस्थिती असणार आहे.
कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत कामगार त्याचप्रमाणे कामगार भूषण पुरस्कारासह गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.