सातारा जिल्ह्यातील यशस्वी झालेला महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प १ मे पासून राज्यात सुरु होणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई  

आठवडा विशेष टीम―

सातारा दि.13 : शालेय व महाविद्यालयींन मुलींच्या स्वसंरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात आलेला  महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प 1 मे पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती.  1 मे ला प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविण्याबाबत गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मुंबई येथून  व्हिसीद्वारे संवाद साधला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. यावेळी  गृह विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, विशेष पोलीस महानिरीक्षक (ट्रेनिक) रविंद्र सेनगांवकर, कोकण विभागाचे  विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर, औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.एम प्रसन्ना, नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. चेरींग दोरजे, अमरावतीचे  विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्यासह सातारचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते.

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राज्यात राबविताना शासनाच्या विविध विभागांचा  सहभाग घ्यावा, असे सांगून श्री. देसाई म्हणाले, राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहचा शाळेमधील मुलींना त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती देवून स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण द्यावे. त्यांच्यात आपले स्वसंरक्षण स्वत: करु शकतात असा आत्मविश्वास निर्माण करा.
जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविताना एक आराखडा तयार करा. विविध विभागांचा सहभाग घेवून या प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करा. या प्रकल्पात जास्तीत जास्त शालेय, महाविद्यालयींन मुलींचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

सातारचे पोलीस अधीक्षक श्री. बन्सल म्हणाले सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प हा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. तसेच एका  कार्यक्रमामध्ये एका मुलीला महिला पथदर्शी प्रकल्पाचा अनुभव  विचारण्यात आला की तुझी छेड काढली तर काय करशील मुलीने सांगितले की आमची छेड काढणाऱ्याला तेथेच धडा शिकवू आम्ही पोलीसांकडेही जाणार नाही महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत आम्हाला स्वरंक्षणाचे धडे देण्यात आले आहे यामुळे आमच्यात आत्मविश्वास वाढला आहे, असे त्या मुलीने सांगितले.

महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पामुळे मुलींचे कमालीचा आत्मविश्वास वाढला असल्याचे श्री. बन्सल यांनी सांगून जिल्ह्यात कशाप्रकारे महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला याची माहिती दिली.
0000