प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन

आठवडा विशेष टीम―

गडचिरोली,(आठवडा विशेष)दि.13: महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा येथे प्राणहिता पुष्करचे आयोजन करण्यात आले असून दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजेपासून पवित्र स्नानाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्राणहिता नदीची पूजाअर्चा संपन्न झाली. प्रथम मंदिरातील देवांच्या मूर्त्यांना यावेळी स्नान घालण्यात आले. त्यानंतर आलेल्या हजारो भाविकांनी नदीत स्नान केले. भाविकांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्तींनीही पहिल्याच दिवशी हजेरी लावली. आजपासून २४ एप्रिल पर्यंत पवित्र स्नान प्राणहिता नदीमध्ये केले जाणार आहे. सिरोंचा घाट येथे पार पडलेल्या शुभारंभ कार्यक्रमावेळी पालकमंत्री शिंदे यांचेसह आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री यांनी उपस्थित भाविक व माध्यमांशी संवाद साधला. प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक करून त्यांनी आलेल्या भाविकांच्या संख्येवरून समाधान व्यक्त केले. आज पहिल्याच दिवशी चांगल्या प्रकारे उपस्थिती असून प्रशासन भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवेल याची मला खात्री आहे असे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या सिरोंचासह गडचिरोलीची नवी ओळख देशभर होण्यास पुष्कर उत्सव महत्त्वाचा आहे. आपण सिरोंचावासीय येणाऱ्या भाविकांचा आदर सन्मान करून उत्सव यशस्वी पार पाडाल याची मला खात्री आहे असेही ते यावेळी म्हणाले.

पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

सिरोंचा घाटासह नगरम घाटावर आज पहिल्याच दिवशी सकाळ पासून विविध राज्यातून भाविक जमा होण्यास सुरुवात झाली. पुष्करचा मुहूर्त दुपारी असल्याने नागरिकांनी दुपार नंतर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे आढळून आले. सिरोंचावासीय तसेच जिल्ह्यातीलही नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, शौयालय, कपडे बदलण्याची सुविधा यासह अनेक सुविधा यावेळी करण्यात आल्या आहेत. पुढिल ११ दिवस येणाऱ्या भविकांची संख्या वाढत जाईल असा अंदाज बांधण्यात येत आहे. कारण यावेळी मंचेरीयल व कालेश्वरम ब्रीज मूळे भाविक पुष्कर साठी सिरोंचा येथे येण्यास उत्सूक असल्याचे म्हटले जात आहे.

****

Back to top button