आठवडा विशेष टीम―
मुंबई, १३ एप्रिल-: फुले-शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे चालवूया चला प्रगतशील महाराष्ट्र घडवूया असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील जनतेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी ते म्हणाले की स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा पहिला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी राज्यातील जनतेला शुभेच्छा देतो. सर्वांनी मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करावी. मागचे २ वर्ष जयंती साजरी करता आली नाही मात्र ह्या वर्षी विविध सामाजिक, आणि लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा” हा संदेश सर्वांनी आत्मसात करावा.
यावेळी ते म्हणाले की, राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारे असून, समाजातील वंचित घटकाला देखील न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या विचारावर चालतानाच आम्ही महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती” या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील “काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ आपण नीट लक्षात घेतली पाहिजे. त्यांचा समतामूलक समाजनिर्मितीचा लढा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा पातळ्यांवर आपण कुठपर्यंत पुढे नेला ? याचा विचार करण्याची गरज आज आली आहे. जाती निर्मूलनाची चळवळ आता तरुणांनी हातात घ्यायला हवी. याचा अन्याय, अत्याचार रोखण्याबरोबरच गुलामगिरी लादणाऱ्या सांस्कृतिक, धार्मिक बदलासाठी ठोस भूमिका घेतली पाहिजे.
भारताच्या इतिहासात अनेक महापुरुषांनी देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशादर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. उच्चविद्याविभूषित असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा, अर्थशास्त्र राज्यशास्त्र, समाजशास पत्रकारिता, जलसंधारण अशा अनेक विषयांवर संशोधन व लिखाण केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखनात त्यांनी लिहिलेले ग्रंथ, पुस्तके, प्रबंध, लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, वर्तमानपत्रे इत्यादींचा समावेश होतो. आणि आजही त्यांचे लिखाण हे सर्वांनाच मार्गदर्शक आहे असे मत श्री भुजबळ यांनी व्यक्त केले.