मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

अमरावती , दि. 16: आदिवासी महिलांच्या उत्पादित वस्तूंना ‘मेळघाट हाट’मुळे हक्काचे व्यासपीठ मिळेल व यातून या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील, असा विश्वास  महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून मेळघाटातील आदिवासी महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री केंद्र अमरावती शहरामध्ये ‘मेळघाट हाट’ या नावाने लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मेळघाट हाटसाठी सायन्स कोर मैदान येथे जागा निश्चित करण्यात आली आहे .पंधरा हजार चौरस फूट जागा या बांधकामासाठी राखीव करण्यात आली आहे. तसेच मेळघाट हाटच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे .

शासकीय विश्राामगृह येथे वास्तुशास्त्र विशारद सायली काकडे यांनी यावेळी मेळघाट हाट येथील प्रस्तावित इमारत बांधकामाचे सादरीकरण केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, माविमचे जिल्‍हा समन्‍वय अधिकारी सुनील सोसे, जिल्हा परिषदेचे उपअभियंता एस. एल. जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा व धारणी तालुका हा ‘मेळघाट’ म्हणून ओळखला जातो. मेळघाट हे क्षेत्र संपूर्ण राज्यात विशिष्ट वनसंपदासोबतच कोरकू संस्कृती , व्याघ्रप्रकल्प , नैसर्गिक शेती तसेच वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनासाठी हा भूभाग प्रसिद्ध आहे. मेळघाट हा  अति दुर्गम व आदिवासी भाग असल्यामुळे तुलनेत रोजगााराच्या संधी कमी आहेत. त्यामुळे रोजगाारासाठी स्थलांतराचे प्रमाण जास्त आहे.  येथील बचतगटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठेचा अभाव असल्यामुळे उत्पादनांना भाव कमी मिळतो. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मेळघाटातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या मालाला लेबलिंग, ब्रँडिंग प्राप्त व्हावे या हेतूने ‘मेळघाट हाट’ ही संकल्पना ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली. मेळघाट हाट लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यादृष्टीने त्यांनी संबंधितांना यावेळी सूचना दिल्यात. मेळघाटमध्ये बचतगटांच्या माध्यमातून सुमारे सत्तरच्या जवळपास उत्पादने घेतली जातात. मेळघाट हा भाग अमरावतीसह बुलढाणा, अकोला तसेच मध्यप्रदेशाशी संलग्न आहे. या सर्व ठिकाणांना क्षेत्रभेटी देवून उत्पादित मालाची माहिती संकलित करून तसा अहवाल सादर करण्याबाबत श्रीमती ठाकूर यांनी श्री. सोसे यांना सूचना केली. मेळघाट हाट इमारत बांधकाम सादरीकरणात त्यांनी सूचना व बदल सुचविलेत.

पालकमंत्र्यांच्या हस्ते जवानाचा सत्कार

शासकीय विश्राामगृह येथे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज विनीत शामराव भगत  या जवानाला शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. श्री . भगत यांनी पुलवामा हल्ल्या घडवून आणणाऱ्या मुख्य आतंकवाद्यास कंठस्नान घातले . या अतुलनीय कामगिरीबद्दल श्री. भगत यांना माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते वीरता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत 23 एन्काऊंटर केलेले असून 40आतंकवाद्यांना कंठस्नान घातले आहे . ते सेंट्रल रीझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ ) मध्ये कार्यरत होते .

000