सिल्लोड-सोयगाव तालुक्याच्या जलसंधारण प्रकल्पांच्या सीमा निश्चितीची  प्रक्रिया पूर्ण करावी – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

आठवडा विशेष टीम―

औरंगाबाद, दिनांक 19 (आठवडा विशेष): निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था व दोन्ही तालुक्यातील जलसंपदा प्रकल्पाबाबतचा जल आराखडा, तसेच  प्रकल्पसीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश  महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत दिले.

बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता श्री.पाटोळे, श्री.आवलगावकर, कार्यकारी अभियंता श्री.गोडसे, श्री.निंभोरे, उपअभियंता आदींची उपस्थिती होती.

सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील अणुक्रमे भराडी आणि खेळणा व  खडकपूर्णा या प्रकल्पाच्या दुरुस्तीबरोबरच शिवना आणि भराडी धरणाच्या सीमारेषा निश्चित करुन मार्कींग करण्याची प्रक्रिया नियोजन जलसंपदा विभागाने करावी गाळपेराचा उपसा करुन काढलेला गाळ शेतीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतचे नियोजन देखील करावी,  या प्रकल्पांची हस्तांतर प्रक्रिया आणि पाणी साठवण क्षमता वाढीसाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याबरोबरच जल आराखड्यात पाण्याचा समावेश, दुरूस्तीचे प्रस्ताव तयार करणे व ते जल परिषदेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश देखील राज्यमंत्री सत्तार यांनी दिले.

जलसंधारणाच्या प्रस्तावांचा शासनाकडे पाठपुरावा करुन सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल व नापिकीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या  आत्महत्या थांबतील परिणामी शेतीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. दोन्ही तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पांची मालमत्ता नोंद घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले. या बरोबरच इतर अनुषंगिक बाबींचा आढावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी  या बैठकीदरम्यान घेतला.

*****