नवचेतना शालेय विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवा – राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

आठवडा विशेष टीम―

अमरावती दि 21: ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा व दर्जेदार शिक्षण देता यावे. विद्यार्थ्यांचे सर्व विषयांवर प्रभुत्व निर्माण होण्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले. टोपे नगर येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)अनिल कोल्हे, (प्राथमिक) गंगाधर मोहने, विस्तार अधिकारी(शिक्षण) प्रवीण खांडेकर, चांदुर बाजार पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शुभांगी श्रीराव, अचलपूरचे गट शिक्षणाधिकारी अब्दुल कलीम, अमरावती येथील जिल्हा व शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता पवन मानकर, दीपक चांदूरे, अकोला येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण  संस्थेच्या अधिव्याख्याता कविता चव्हाण, अकोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विज्ञान पर्यवेक्षक प्रमोद टेकाडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अचलपूर जिल्हा परिषदेच्या 7  व चांदुर बाजार येथील 7 अश्या 14 शाळांचा दर्जा व  शैक्षणिक गुणवत्ता नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढविण्यात येणार आहे. यात दोनीही तालुक्यातील प्रत्येकी 5 मराठी व 2 उर्दू शाळांचा समावेश असणार आहे. अकोला येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती श्री कडू यांनी दिली.

नवचेतना शालेय  विकास कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वसमावेशक नियोजन करावे

नवचेतना शालेय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्यंत आवश्यक त्या बाबींचा समावेश प्राधान्याने करण्यात यावा.शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा व पालक-विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे सर्वसमावेशक नियोजन करण्यात यावे. कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळेसाठी एकत्र येणाऱ्या गावांचा प्रामुख्याने समावेश करण्यात यावा. असे निर्देश राज्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले.