आठवडा विशेष टीम―
पुणे दि.२२: पुणे शहरातील रस्ते, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, शासनातर्फे आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
हडपसर येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, पाणी पुरवठा विभागाचे व्ही.जी.कुलकर्णी, नगरसेवक प्रमोद भानगिरे यांच्यासह समीर तुपे, राजेंद्र बाबर, नितीन गावडे आदी उपस्थित होते.
श्री.सामंत म्हणाले, महापालिकेतर्फे नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सोईसुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांचे प्रश्न वेळेवर सोडविले जातील याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. हडपसर परिसरात चांगली विकासकामे झाल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री सामंत यांच्या हस्ते हडपसर येथील कै.दत्तोबा ऊर्फ आप्पा शंकर तरवडे पाझर तलाव आणि मोठ्या व्यासाच्या पावसाळी लाईनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते राष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू राधिका महाजन हिला प्रमोद भानगिरे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या एकूण सहा लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
000