‘मनरेगा’तून रोजगार निर्मिती बरोबरच पायाभूत सुविधांची उभारणी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 24 : विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी व एकसंध परिणामातून अमरावती जिल्ह्यात सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. जिल्ह्यात ‘मनरेगा’शी ग्रामीण भागातील विकासकामांची सांगड घातल्याने अनेक कामांना गती मिळाली आहे,  असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पेव्हिंग ब्लॉकसह काँक्रिट रस्ता, काँक्रिट नाली आदी विविध कामांचे भूमिपूजन, तसेच लोकार्पण पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धामोरी, निंदोळी, नवथळ, खोलापूर, अंचलवाडी आदी विविध गावांत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार नीता लबडे, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अमरावती व भातकुली तालुक्यात ‘मनरेगा’तून सुमारे ३ कोटी रूपये निधीतून गावांतर्गत रस्तेविकासाची कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे गावोगाव चांगले रस्ते निर्माण होऊन ग्रामीण भागातील बांधवांसाठी उत्तम सुविधा निर्माण झाली आहे. दोन्ही तालुक्यांत सर्वदूर कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी कामे पूर्णत्वास जात आहेत. रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उत्तम मुलभूत सुविधांची निर्मिती होत आहे. यापुढेही आवश्यक तिथे कामे  हाती घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणाचे निर्देश प्रशासनाला दिले.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.