चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना

आठवडा विशेष टीम―

कोल्हापूर दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून अधिक चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली. शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले. कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबुराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून ‘ कोल्हापूर स्कूल ‘अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली. या कलेचा जागर अखंडीत ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासीक शाहू मिलमध्ये एकत्र आले होते.

 

यामध्ये १३०हून अधिक जेष्ठ व नामवंत चित्रकार / शिल्पकार सहभागी झाले होते. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या हस्ते झाले . यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड , शिरीष बिवलकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते .

नागरिकांना ही प्रात्यक्षिके तब्बल ४ दिवस पाहता येतील .या उपक्रमासाठी कॅमल कंपनीने सहकार्य केले असून सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने मोफत उपलब्ध करून दिले आहे.

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट,कला निकेतन कला महाविद्यालय, कला मंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंग बहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील इतर चित्रकार, शिल्पकार आदींच्या उत्स्फुर्त सहभागातून हा उपक्रम संपन्न झाला.

या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्राचे प्रदर्शन, ‘कृतज्ञता पर्वात’ शाहू मिल परिसरात होणार आहे. याप्रसंगी नंदकुमार गायकवाड, जयप्रकाश ताजणे दिलीप घेवारी, सिद्धार्थ लांडगे, रंजित चौगुले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते .

0000000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.