रस्ते विकासाबरोबर पाण्याचे स्त्रोत निर्माण होणार – नितीन गडकरी

आठवडा विशेष टीम―

सोलापूर,दि.25 (आठवडा विशेष): सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली तर कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या विकासाबरोबर रस्त्याच्या कडेला पाण्याचे स्त्रोत देखील येत्या काळात निर्माण होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केली.

सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर- विजयपूर, सोलापूर-सांगली आणि सोलापूर-अक्कलकोट असे तीन राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण श्री. गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे बटण दाबून करण्यात आले. 8 हजार 17 कोटी रुपयांतून 250 किमी लांबीचे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. तर 164 कोटी रुपयांच्या कामातून 42 किमी लांबीच्या महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विजापूरचे खासदार रमेश जिगजिनी, आमदार सर्वश्री रणजितसिंह मोहिते-पाटील, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 30 हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अद्यापही काही कामे सुरू होत आहेत. त्यामुळे निश्चीतच सोलापुरात पुढील काही वर्षात 60 हजार कोटी रुपयांची कामे होतील. राज्यातील इतका मोठ्या प्रमाणावर निधीतून सोलापूर जिल्ह्यात कामे होणारा बहुधा हा पहिलाच जिल्हा आहे. सोलापूर शहरातील उड्डाण पुलासाठी मनपा, पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाचे काम सुरू करावे, तात्पुरता निधी केंद्राकडून उभा करू.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी सोलापूर-पुणे महामार्ग सहा पदरी करणार असल्याचे त्यांनी मान्य केले. सुरत-चेन्नई हा महामार्ग ग्रीन कॉरिडॉर म्हणून ज्या भागातून जाणार तिथे उद्योग येतील, भागाचा विकास होईल, इंधनात, पैशाची बचत होणार आहे. शिवाय या भागात औद्योगिक आणि लॉजिस्टीक पार्कच्या योजना तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

येत्या काळात राष्ट्रीय महामार्ग तयार करताना रस्त्याच्या कडेला उत्खनन करुन पाण्याचे स्त्रोत देखील निर्माण करणे गरजेचे आहे. हेच पाणी शेतीला ठिबक सिंचनाद्वारे गेले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्टीने वाढेल. रस्ते विकासाबरोबर शेतकरीदेखील सुखी होईल, असा विश्वासही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला.

बायो इथेनॉल तयार करा

जिल्ह्यातील साखर उत्पादकांनी आता साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीचे प्रयत्न केले पाहिजेत. इथेनॉल निर्मितीतून वाहनांची वाहतूक सुरू केली पाहिजे. अन्यथा भविष्यात साखर उद्योग चिंताग्रस्त होईल. बायो इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन चालते. यावर चालणाऱ्या गाड्या भारतात येणार असून आता पेट्रोलची गरज भासणार नाही. येणारा काळ ग्रीन हायड्रोजनचा असून को-जनरेशन याचे करा. दुषित पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार होत असल्याने कारखाने टिकतील.

इलेक्ट्रीक बस हायवेवर केबलद्वारे धावणार

सध्या इलेक्ट्रीक बस आणि कारचा जमाना आहे. महामार्गावर केबल बांधून इलेक्ट्रीक बस आणि कार चालविणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

सोलापूरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उजनीसोलापूर पाईपलाईन पालकमंत्री भरणे

सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे. समांतर पाईपलाईनच्या सोबत आणखी एक पाईनलाईन उजनी-सोलापूर टाकण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याने सोलापूरचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. देशात रस्त्याचे जाळे निर्माण करणारे आणि पूर्ण क्षमतेने काम करणारे नेते म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिले जाते. नितीन गडकरी आणि शरद पवार हे नेते प्रत्येक समाजाला न्याय देणारे, माणसे जोडणारे, प्रत्येकाला मदत करणारे अशा व्यक्ती आहेत.

सोलापूर जिल्ह्यात रस्त्याचे जाळे 325 किमीवरून 1350 किमीचे काम झाले आहे. बाह्य वळणाचे 187 किमीचे कामे सुरू आहेत. बोरामणी विमानतळासाठी वन विभागाची अडचण दूर केल्यानंतर चांगल्या प्रकारचे विमानतळ होईल, असा विश्वास श्री. भरणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे सरव्यवस्थापक अंशुमनी श्रीवास्तव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त हरिष बैंजल, मनपा आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार डॉ. महास्वामी, खासदार श्री.नाईक-निंबाळकर, विजापूरचे खासदार रमेश जिगाजिनगी, आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांनी विविध मागण्या मांडल्या.

नितीन गडकरी म्हणाले….

नागरिकांच्या आश्वासनाची पूर्तता करणार.

लॉजिस्टीक पार्क बांधून राज्य सरकारला पार्टनरशिप देणार.

सोलापुरातील उड्डाणपुलाला मदत करणार.

सोलापूर-विजापूर सहा पदरी करणार

सोलापूर-पुणे सहा पदरी करणार.

बायो इथेनॉलवर भर देणार.

जलसंवर्धनामुळे सांगली-सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटला.

दिल्लीतून सर्व शहरे महामार्गाने जोडली.

सुरत-चेन्नई महामार्ग भागात औद्योगिक आणि लॉजिस्टिक पार्कच्या योजना तयार करा.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.