शाश्वत उत्पन्नासाठी बांबू लागवड किफायतशीर – पालकमंत्री जयंत पाटील

आठवडा विशेष टीम―

जिल्ह्यात बांबू लागवडीचा प्रयोग यशस्वी करा

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबने आवश्यक आहे. त्यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण यासह सर्व संबंधित यंत्रणा शेतकऱ्यांना आवश्यक ते सहाय्य व सर्वोतपरी मार्गदर्शन करतील, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

माणगंगा उद्योग समुह आटपाडी यांच्या विद्यमाने आटपाडी येथील जवळे मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळेत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थीतीत, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक विजय माने, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विलास काळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, प्रातांधीकारी संतोष भोर, तहसिलदार बाई माने, सहायक जिल्हाधिकारी विशाल नरवाडेमाणगंगा उद्योग समुहाचे संस्थापक आनंदराव पाटील, भारततात्या पाटील, सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक अजित भोसले, कैलास माने, गणेश शिंदे, अरविंद कल्याणकर, विनोद पाटील, अविनाशकाका पाटील, ॲड. बाबासाहेब मुळीक, बबनबापू क्षीरसागर, सपंतराव पाटील, सादीक खाटीक, शशीकांत भोसले, मनोहर विभूते, विजय पुजारी, गजानन गायकवाड यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, बांबूला एकविसाव्या शतकातील हिरवे सोने म्हणले जात आहे. सध्याच्या बाजारापेठेनुसार या उत्पादनाला जागेवर टनाला तीन ते साडेतीन हजार रूपये दर मिळत आहे. एकदा लागवड केल्यावर पुढे ८० ते १०० वर्षे उत्पादन घेता येते. बांबूपासून विविध मुल्यवर्धीत उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यामुळे आटपाडी तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचा या पिकाकडे निश्चित कल वाढेल.बांबूच्या रूपाने एक चांगले पीक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. सर्वच शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा प्रयोग करायला हरकत नाही. पाण्याची कमतरता असनाही आटपाडीकरांनी डाळिंबाचे चांगल्या प्रकारे पीक घेतले. आता तर पाण्याची चांगली उपलब्धता झाली आहे. त्यामुळे बांबू लागवडीचा यशस्वी प्रयोग येथील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने करावा. यासाठी कृषी, वन, सामाजिक वनीकरण यासह सर्व संबंधीत यंत्रणा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य आणि मार्गदर्शन करतील. सध्या बांबू लागवडीसाठी मिळणारे अनुदान दोन हेक्टर   क्षेत्रावरील लागवडीसाठीच असून क्षेत्राचे बंधन काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुरूवातीला मोठ्या शेतकऱ्यांनी पाच एकरापर्यंत हे पीक घ्यावे, असे अवाहन ही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, बांबू लागवड ही अत्यंत चांगली योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा होवू शकतो. एकाच प्रकारचे वारंवार पीक घेण्यापेक्षा पिके बदलून घेतल्याने उत्पादकता वाढते व जमिनीचा पोतही सुधारतो. त्या दृष्टीने नवीन बांबू लागवड शेतकऱ्याठी निश्चीतच फायदेशीर ठरेल. यासाठी मनरेगा किंवा अटल बांबू मिशन या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासनाचे सहाय्यही उपलब्ध झाले आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच शेतकऱ्यांनी गटा गटाने सामुदायिक तत्वावर मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड केल्यास प्रोसेसिंग युनिटसाठी मदत करू, असे सांगून  या कार्यशाळेत सहभागी प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वता:ही बांबू लागवड करावी आणि इतरानांही याबाबत सांगावे, असे आवाहनही यावेळी केले.

माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले, नवनवीन प्रयोग करणे, आणि या प्रयोगांमधून ज्ञान आत्मसात करणे हे आटपाडी तालुक्याचे वैशीष्टय आहे. येथील शेतकरी अभ्यासू आहे. जशी डाळींब निर्यातीत आटपाडी तालुक्याने क्रांती घडवून आणली आहे, तशीच क्रांती बांबू लागवडीतही येत्या काळात होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उपवनसंरक्षक विजय माने म्हणाले, बांबू लागवडीमध्ये रोजगार निर्मितीची फार मोठी क्षमता आहे. बांबू लागवडीसाठी गावानुसार बांबूची प्रजाती निवडता येते. चार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर बांबू लागवड करणाऱ्यांना 80 टक्के सबसिडीने व गुणवत्तापूर्ण रोपे मिळतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा.

सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी विलास काळे म्हणाले, बांबू लागवडीमुळे शाश्वत उत्पन्न अर्थीक फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे. बांबूपासून 26 प्रकारची मूल्यवर्धीत उत्पादने घेता येतात. अर्थीकदृष्टया परवडणारे गरीबांचे लाकूड म्हणून याकडे पाहिले जाते. आपल्या देशात सव्वीस हजार कोटींची बांबू उत्पादनाची बाजारपेठ आहे. बांबू लागवड ही शेतकऱ्यांच्या हिताची व पर्यावरणपूरक आहे.  ज्या शेतकऱ्यांकडे पाच गुंठे ते दोन हेक्टर पर्यंत जमिनीचे क्षेत्र आहे, असे सर्व शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत 100 टक्के अनुदानावर बांबू लागवड करू शकतात. ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र दोन  हेक्टर पेक्षा जास्त आहे, असे सर्व शेतकरी 80 टक्के ते 50 टक्के फक्त रोपे खरेदीच्या अनुदानावर बांबू शेती करू शकतात. शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ म्हणाले, शिराळा सारख्या  अति पावसाच्या भागापासून ते जत,आटपाडी सारख्या कमी पावसाच्या भागात बांबू लागवड करता येते. जिल्‌ह्यात बांबू लागवडीला मोठी संधी आहे. या पिकाच्या 153 प्रजाती आहेत. शेतकरी अभ्यासपूर्वक प्रजाती निवडू शकतात.

या कार्यशाळेचे संयोजक माणगंगा उद्योग समूह आटपाडीचे संस्थापक आनंदराव पाटील म्हणाले, बांबू हेअत्यंत किफायतशीर पीक असून विद्युत निर्मितीतही याचा उपयोग होत आहे. कमी देखभालीत हे पीक येते. दोन हेक्टर मर्यादेत बांबू लागवडीसाठी भरीव अनुदान आहे. शासनाने अनुदानसाठीची क्षेत्राची मर्यादा काढावी , अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

या कार्यशाळेत बांबू लागवड यशस्वी करणारे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीचे शेतकरी  अरविंद कल्याणकर, बांबूपासून पॅलेट्स निर्मिती करणारे औरगाबादचे कैलास नागे, ज्वाली बोर्डसे व्यवस्थापक गणेश शिंदे आदींनी मार्गदर्शन केले.

कृषी तंत्र विद्यालय आटपाडी येथे पालकमंत्री जयंत पाटील जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांच्या हस्ते बांबु ची रोपे लावण्यात आली. शेवटी सादिक खाटीक यांनी आभार मानले .

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.