प्रशासकीय

पाणी टंचाई असेल तेथे तातडीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर द्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

आठवडा विशेष टीम―

शिर्डी, दि. 25 : – (उमाका वृत्तसेवा) – या वर्षी कमी पर्जन्यमान झाला आहे. त्यामुळे  काही गावांमध्ये पाण्याची कमतरता  भासत आहे.  येणाऱ्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत  पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे ज्या गावांची मागणी असेल त्या ठिकाणी अधिकारी पाठवून माहिती घेऊन तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावे असे निर्देश सूचना महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

संगमनेर उपविभागीय कार्यालय येथे झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सभापती सुनंदाताई जोर्वेकर , उपसभापती नवनाथ अरगडे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ,  प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम , उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरुळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी भाऊसाहेब कुटे, महेंद्र गोडगे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, किरण मिंडे, काशिनाथ गोंदे, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, अशोक सातपुते, बी. आर चकोर, दादासाहेब कुटे,  सुभाष सांगळे,   निखिल पापडेजा, आनंद वर्पे, राजेश तिटमे अदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. थोरात म्हणाले की, काही वर्षांपूर्वी शंभर टँकरची मागणी या तालुक्यात होत होती. अशा कठीण परिस्थितीतून अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशासनाने दुष्काळी परिस्थिती हाताळली.यावर्षी  कमी पाऊस झाल्याने काही गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी तातडीने अधिकारी पाठवून पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या. तसेच ज्या गावांमध्ये रोजगार हमीच्या कामांची मागणी असेल आणि वीस मजूर कामावर येण्यास तयार असेल तेथेही तातडीने रोजगार हमीचे कामे सुरू करा अशा सूचना प्रशासनाला दिल्या.  तसेच तालुक्यात तलाव दुरुस्तीसाठी मोठा निधी प्राप्त झाला असून पदाधिकाऱ्यांनी तलाव दुरुस्तीचे कामे चांगली करून घ्या अशी सूचना केली.

पुढे बोलताना मंत्री श्री. थोरात म्हणाले,  आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी विभागनिहाय खरीप आढावा बैठक घेण्याची परंपरा सुरू केली. आपण कृषिमंत्री असताना महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात खरीप आढावा बैठक घेऊन काम केले. सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र शासनाने लोडशेडिंगचे संकट टाळण्यासाठी वीज खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तहसीलदार अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी आभार मानले केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button