आठवडा विशेष टीम―
अमरावती, दि. 25 : वलगाव येथील 147 पूरग्रस्त कुटुंबांना महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पट्टेवाटप आज झाले. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या मागणीच्या पालकमंत्र्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. प्रत्येक अडचणीवर मात करत कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. त्यामुळे पूरग्रस्त बांधवांना हक्काचे पट्टे मिळू शकले. महाविकास आघाडी शासन खंबीरपणे आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
वलगाव येथील सिकची रिसॉर्ट येथे पट्टेवाटपाचा कार्यक्रम झाला. पुनवर्सन उपजिल्हाधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, प्राचार्य लताताई कोठारी, गजानन राठोड, मोहिनी मोहोड, हरिष मोरे आदी उपस्थित होते. पट्टेवाटपाची प्रक्रिया ईश्वरचिठ्ठी पद्धतीने राबविण्यात आली.
प्रशासनातर्फे आवास योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी. येथील 42 नागरिकांची घरकुले मंजूर करण्यात आहेत. ती प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी. पावसाळ्यापूर्वी घरकुलांचे अधिकाधिक काम पूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
वलगाव परिसरातील 2007 मधील पूर बाधित नागरिकांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यामुळे पूरग्रस्त बांधवांना हक्काचा भूखंड मिळू शकला अशी भावना या बांधवांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000