प्रशासकीय

मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि.26 : कृषिमालाची वाहतूक करण्यासोबतच शेती यंत्रसामग्री घेऊन जाण्यासाठी चांगल्या शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. यासाठी मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामांना गती देऊन मंजूर पाणंद रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी आज येथे दिले.

वनामती येथील सभागृहात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजनेच्या अंमलबजावणीबाबत नागपूर विभागाची आढावा बैठक रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार आशिष जयस्वाल, मनोहर चंद्रीकापूरे, राजू कारेमोरे यांच्यासह विभागातील लोकप्रतिनिधी तसेच रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, नरेगा आयुक्त शंतनु गोयल, जिल्हाधिकारी आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), नयना गुंडे (गोंदिया), संदीप कदम (भंडारा), अजय गुल्हाने (चंद्रपूर), संजय मिना (गडचिरोली) यावेळी उपस्थित होते.

श्री. भुमरे म्हणाले की, शेती व शेतीपूरक उद्योग-व्यवसायांचा विकास होण्यासाठी पाणंद रस्त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. शेतमाल बाजारात पोहचविण्यासाठी तसेच यंत्र सामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला चांगल्या शेतरस्त्यांची गरज आहे. मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित मिळावा यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 15 जूनपर्यंत पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण करावे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करुन द्यावे. ज्या गावात रोहयोच्या कामांवर मजुरांचा प्रतिसाद चांगला आहे, तेथे आवश्यकतेनुसार नवीन कामे हाती घ्यावीत.  यामुळे स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना आर्थिक स्थैर लाभेल. आर्थिक दुर्बल तसेच अकुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे, हा रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण राज्यात प्रत्येक पंचायत समितीत रोजगार सेवकाला कामकाजासाठी तसेच आसन व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी मातोश्री भवन स्थापन करण्यात येईल. राज्यात एक लाखांवर पाणंद रस्त्यांची मागणी आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या रस्त्यांची कामे करण्यावर भर द्या. याशिवाय शाळेची कुंपण भिंत, स्मशानभूमी अशा कामांसाठीही रोहयो मजुरांची मदत घ्या. पाणंद रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

रोहयो अंतर्गत मजुरांनी कामाची मागणी केल्यास त्यांना 15 दिवसाच्या आत काम उपलब्ध करुन द्यावे. मजुरांसाठी जॉबकार्ड तयार होणे आवश्यक असल्याने संबंधितांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. यासाठी गट विकास अधिकाऱ्यांनी क्षेत्रनिहाय भेटी द्याव्यात. रोहयोच्या कामांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. मातोश्री पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांप्रमाणे गावकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार असल्यामुळे ती कामे त्वरित पूर्ण करुन कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. तसेच प्रत्येक जिल्ह्यांनी यंत्रणानिहाय व तालुकानिहाय कामाचे वाटप करुन रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करावे, असे निर्देश श्री. नंद कुमार यांनी यावेळी दिले.

विभागीय आयुक्त डॉ. खोडे यांनी नागपूर विभागातील मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

रोहयो उपजिल्हाधिकारी श्री. भट यांनी सूत्रसंचालन केले. रोहयो कामांमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कार्यकारी अभियंता तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button