लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात कृतज्ञता पर्व कार्यक्रमास सामाजिक न्याय विभागातर्फे ५ कोटी रुपये मंजूर

आठवडा विशेष टीम―

मुंबई (दि. 27) – : लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या येत्या 6 मे रोजी येणाऱ्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात ‘लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ चे आयोजन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत कोल्हापूर जिल्हा प्रशासनास 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

याबाबतचे शासन परिपत्रक सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी आज जारी केले आहे.

ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दी कार्यक्रम आयोजनाबाबत सुचवले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही याबाबत सूचना केली होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनीदेखील पत्राद्वारे धनंजय मुंडे यांना राजर्षी शाहू महाराजांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात स्मृतिशताब्दी कार्यक्रमांचे आयोजनसाठी सामाजिक न्याय विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्याची धनंजय मुंडे यांना विनंती केली होती.

लोककल्याणकारी लोकराजा, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजकारणाचा पाया खऱ्या अर्थाने मजबूत करून सामाजिक न्यायाची वाटचाल सुकर केली. 6 मे 1922 रोजी त्यांचे कोल्हापूर येथे निधन झाले. येत्या 6 मे, 2022 रोजी या घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाच्या कृतज्ञ भावातून हे कृतज्ञता पर्व साजरे करत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

दि. 28 एप्रिल, 2022 ते 22 मे, 2022 या दरम्यान हे कृतज्ञता पर्व चालणार आहे. यामध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, प्रश्नमंजुषा, विज्ञान प्रदर्शन, कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र- हस्तकला प्रदर्शन, सिटी बाजार, मर्दानी खेळ, सायकल रॅली, चित्ररथ, कृतज्ञता फेरी यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले असून, 5 कोटी रुपयांचा निधी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापूर यांना उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांसह राजर्षी शाहू महाराज प्रेमींनी धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.