मुंबईत महाराष्ट्र दिन समारंभाची रंगीत तालीम

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण होईल. सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत महाराष्ट्र दिनाचा हा समारंभ आयोजित करण्यात आला असून आज या कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव भरत गावडे यांनी ध्वजारोहण केले.

आज झालेल्या रंगीत तालमीत अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुप कुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) एस. जयकुमार, राजशिष्टाचार विभागाचे संबंधित अधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

रंगीत तालमीत झालेल्या संचलनात संचलन प्रमुख अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे, संचलन उप प्रमुख सायबर क्राईम चे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, ध्वजाधिकारी सशस्त्र पोलीस वरळी चे राखीव पोलीस निरीक्षक रमेश लोखंडे, जीप नियंत्रक मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक निंबाळकर यांच्यासह राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस निशाण टोळी, राज्य राखीव पोलीस बल निशाण टोळी, मुंबई अग्निशमन दल ध्वज, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ, बृहन्मुंबई आणि ठाणे जिल्हा, ब्रास बॅण्ड पथक, पाईप बॅण्ड पथक, बृहन्मुंबई अश्वदल पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक) तसेच मुंबई अग्निशमन दल वाहने- आर्टिक्युलेटेड वॉटर वाहन (AWT), मोबाईल वॉटर ट्रान्स्पोर्टेशन वाहन (MWT), हाय राईझ फायर फायटिंग वाहन (HFFV) या पथकांनी सहभाग घेऊन राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.