अवैध सावकारी लूट खपवून घेतली जाणार नाही –  सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

आठवडा विशेष टीम―

नांदेड (जिमाका) दि. 29 :- अवैध सावकारी लूट थांबविण्यासाठी कायदेविषयक जेवढे प्रावधान आहेत त्याचा काटेकोर वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून याला आळा घातला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अवैध सावकारांनी कब्जा करून ठेवल्या आहेत, हडप केलेल्या आहेत त्या जमिनी मूळ मालक असलेल्या शेतकऱ्यांना परत करण्याबाबत कायदाचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले.

नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक सहसंचालक (साखर) सचिन रावळ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. मुकेश बारहाते, मार्केटिंग फेडरेशनचे उपसरव्यवस्थापक वीर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बाजार समितीचे सचिव व वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा गाळपाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. हे गाळप 25 मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रादेशिक सहसंचालक सचीन राव यांना दिल्या. जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपासाठी 2021-22 या आर्थिक वर्षात एकुण लक्षांकाच्या 75 टक्के कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा बँकेने लक्षांकाच्या 87 टक्के कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हा बँकेतर्फे दोन एटीएम व्हॅन व नवीन एटीएम कार्ड वाटप तसेच एटीएम उभारणीसाठी पुढाकार घेतला. प्रतिकुल परिस्थितीतही जिल्हा बँकेने 12 कोटी रुपयांचा नफा कमावला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजे. याचबरोबर बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढविण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. नांदेड येथे सहकार खात्यातील सर्व संबंधित कार्यालयांसाठी एक प्रशस्त इमारत, सहकार संकुल उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असेही त्यांनी उपनिबंधक नांदेड यांना सांगितले.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.