आठवडा विशेष टीम―
नागपूर, दि. 30 : जनतेच्या समस्या सोडविण्यासोबतच त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये दर्जेदार विकासकामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आग्रही असले पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. प्रेमनगर परिसरातील विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार दीनानाथ पडोळे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य तथा माजी नगरसेविका आभा पांडे, माजी नगरसेवक दुनेश्वर पेठे यांची यावेळी उपस्थिती होती. प्रेमनगर परिसरात 2 कोटी 30 लक्ष निधीतून झालेल्या एनआयटी उद्यान नूतनीकरण आणि सिमेंट रस्त्यांचे लोकार्पण श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनानंतर आता पुन्हा राज्यात विकास कामांना गती मिळाली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आपल्याला मिळणाऱ्या निधीतून दर्जेदार सुविधा निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, असे श्री. पवार यावेळी म्हणाले. नागपुरातील विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून देण्यासोबतच शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमनगर परिसरातील विकास कामांसाठी सुमारे 3 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यापैकी 2 कोटी 30 लक्ष रुपये निधीच्या कामाचे लोकार्पण आज होत असून उर्वरित 70 लक्ष रुपये निधीतून घ्यावयाच्या कामांची यादी तातडीने द्यावी. त्यांनाही लवकरच मंजुरी दिली जाईल, असे ते म्हणाले.
प्रारंभी श्रीमती पांडे यांनी प्रास्ताविकात प्रेमनगर परिसरात झालेल्या विकासकामांची माहिती दिली. तसेच यापुढेही नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
*****