जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु – पालकमंत्री वर्षा गायकवाड

आठवडा विशेष टीम―

  • लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ‘संवाद दिन’कार्यक्रमाची सुरुवात
  • पोलीस विभागाच्या महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा (डायल 112) व्हॅनचे लोकार्पण
  • जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीमध्ये 1 मे पासून जलशक्ती अभियान राबविण्यात येणार

हिंगोली, (जिमाका) दि. 01 : हिंगोली जिल्ह्यातील सर्व 563 ग्रामपंचायतीचे ई-ग्रामस्वराज्य प्रणालीमध्ये आर्थिक वर्षाचे लेखे मुदतीत बंद करण्यात आले असून हिंगोली जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली असून माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगर परिषदेने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावून 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. यासाठी त्यांनी हिंगोली नगरपरिषदेचे अभिनंदन करतांना जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करु, असे आवाहनही पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी या प्रसंगी केले.

येथील संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  विशाल राठोड, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती गायकवाड पुढे म्हणाल्या की, यावर्षी नव्यानेच ‘पहिले पाऊल-शाळा पूर्व तयारी अभियान’ महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रातील ही एक महत्वपूर्ण लोकचळवळ आहे. इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र बालकांसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातही बालकांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून अंगणवाड्या बंद असल्याने बालकांना शाळा पूर्व तयारीच्या कृतीची संधी मिळाली नाही. त्यामुळे बालकांची पहिलीच्या वर्गात सहज अध्ययन-अध्यापन प्रक्रीया घडून यावी यासाठी शाळापूर्व तयारी अभियान हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले

आज महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाचे औचित्य साधून शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विहित वेळेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये शिक्षण विभागाने 105 लोकसेवा नव्याने अधिसुचित केल्या असून आज राज्यभरात त्याचा प्रारंभ होत आहे. यात शाळा सोडल्याचा दाखला, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, बोनाफाईड प्रमाणपत्र, कर्मचा-यांची सेवानिवृत्ती प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी, शिक्षकांच्या वैयक्तीक मान्यता, शालार्थ प्रणाली ई. सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. यामुळे शालेय शिक्षण विभागाची गतिमानता वाढण्यास आणि विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना देय असलेल्या सुविधा वेळेत मिळण्यास निश्चित मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सेवा विषयक प्रश्न न्याय भूमिकेतून आणि तत्परतेने सोडवण्यासाठी लोकशाही दिनाच्या धर्तीवर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी ‘संवाद दिन’ सुरु करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावेत यासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात 132 उपकेंद्रे आणि 24 आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. ही केंद्रे इंटरनेटने जोडण्यात आली असून मुंबई, दिल्ली आदी मोठ्या शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणार आहे. जिल्ह्यात 16 एप्रिलपासून या सेवेस सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत रुग्णांना गावातच आरोग्यसुविधा, उपचार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांसह येथील डॉक्टरांनाही थेट मोठ्या शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मदत घेता येणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले.

राज्याच्या कुष्ठरोग कार्यक्रम निर्देशांकानुसार कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमामध्ये हिंगोली जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असल्याचे सांगतांना श्रीमती गायकवाड पुढे म्हणाल्या की, यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये हिंगोली येथे 100 खाटांचे स्त्री रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या कामासाठी 42 कोटी 43 लाख 70 हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामास लवकरच प्रारंभ होणार असून या रुग्णालयाचा फायदा हिंगोली जिल्ह्यातील महिलांना होणार आहे, असे सांगितले.

एक जिल्हा एक पीक या उप्रक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात हळदीचे विक्रमी उत्पादन होत असल्यामुळे मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील वसमत येथे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे. या संशोधन केंद्रामध्ये प्रामुख्याने हळद पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी संशोधन करण्यात येणार असून त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात गतवर्षी जून-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या 2 लाख 97 हजार 867 शेतकऱ्यांना मदत म्हणून 276 कोटी 76 लाख निधी वाटप करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 563 ग्रामपंचायतीमध्ये 1 मे पासून जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात जल पुनर्भरणाची कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत इमारतीसह इतर ज्या शासकीय इमारती असतील तेथे जल पुनर्भरणाची कामे करण्यात येणार असल्याने जलसाठा वाढीसाठी त्याचा निश्चितच  फायदा होणार आहे.

जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे 2021-22 चे वार्षिक उद्दिष्ट 29 हजार 577 होते. जिल्ह्याने 32 हजार 518 लाभार्थ्यांना आरोग्य विभागाच्या वतीने 12 कोटी 68 लाख 87 हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे. याबाबत जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण केले असून त्याची टक्केवारी 110 टक्के एवढी असल्याचे सांगितले.

पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सक्षम महिला-सक्षम समाज घडविण्यसाठी ‘जननी’ अभियान राबविण्यात येत असून यामध्ये प्रत्येक गावात व्हिडिओ प्रझेंटेशन, बॅनर, पोस्टर व समुपदेशन करुन महिलांच्या कायद्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. तसेच स्त्री भ्रूण हत्या, महिला अत्याचार, महिला व बालकांचे लैंगिक शोषण, इ. विषयावर जनजागृती करण्यात येत आहे.

अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना त्वरित मदत मिळावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने डायल 112 हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 15 चारचाकी वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून ही सेवा 24 तास कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत आजवर विविध घटकांची कामे पूर्ण करुन अनुदानाची मागणी केलेल्या हिंगोली जिल्ह्यातील 24 हजार 506 शेतकऱ्यांना 74 कोटी 17 लाख 96 हजार 771 रुपयाचे थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे (डीबीटी) वितरीत करण्यात आले आहे.

वन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या पावसाळ्यात 193 हेक्टर क्षेत्रावर 2 लाख 45 हजार रोपांची नियमित वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच जपान देशाचे प्रसिध्द वनस्पती शास्त्रज्ञ अकिरा मियावॉकी पध्दतीने सुमारे आनंद घनवन करण्यात येणार असून जिल्ह्यात 202 हेक्टर क्षेत्रावर 5 लाख 20 हजार रोपे लागवड करण्यात येणार आहेत.

सद्यस्थितीस तापमानात होत असलेली वाढ लक्षात घेता वन्यजीवास पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी 35 नैसर्गिक व 100 कृत्रिम पाठवठ्यामध्ये नियमितपणे टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

वन पर्यटन स्थळांचा विकास या राज्य योजनेअंतर्गत वन विभागातर्फे हिंगोली, औंढा, वारंगा, येलदरी येथे पर्यटन विकास कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणी पर्यटकांसाठी वनउद्याने, लहान मुलांसाठी खेळणी, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय,पॅगोडा, फुलपाखरु गार्डन यासारखे विविध कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वृध्दी झालेली असल्याचे सांगतांना पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, हिंगोली नगर परिषदेने संसदरत्न स्व. राजीव सातव सभागृहाच्या मागील मोकळ्या जागेत 5 हजार घनवन वृक्ष लागवड केली आहे. कयाधू नदीवर असलेल्या स्मशानभूमीत 3 हजार स्मृतीवन व शहरातील रस्त्यावर 7 हजार असे एकूण 15 हजार वृक्षाची लागवड केली आहे. माझी वसुंधरा अभियानात हिंगोली नगर परिषदेने महाराष्ट्रातून पहिला क्रमांक पटकावून 5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळविले आहे. यासाठी त्यांनी हिंगोली नगरपरिषदेचे अभिनंदन केले.

जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम दि. 6 एप्रिल ते 16 एप्रिल, 2022 या कालावधीत साजरा करण्यात आला असून  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित विविध स्पर्धा, जनजागृती शिबीर, आरोग्य विषयक शिबीर, ग्रामीण व शहरी भागात समतादूतामार्फत सामाजिक  न्याय विभागाच्या विविध योजना बाबत प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून सन 2020-21 व 2021-22 या वर्षात 1139 अर्ज पात्र झाले असून 398 विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा पहिल्या हप्त्याची 87.46 लक्ष रुपये त्यांच्या आधार सलग्न खात्यात वितरीत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरीही मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यांनी अद्यापही कोविडची लस घेतली नाही, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी व ज्याचा दुसरा डोस बाकी आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहनही पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी केले.

शिक्षण विभागाच्या 105 विविध लोकसेवांचे ऑनलाईन लोकार्पण

यावेळी पालकमंत्री श्रीमती वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विहित वेळेत सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये शिक्षण विभागाने 105 लोकसेवा नव्याने अधिसूचित केल्या असून आज त्याचे लोकार्पण पालकमंत्री तथा राज्याच्या शिक्षण मंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आज करण्यात आले.

तसेच पोलीस विभागामार्फत अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना त्वरित मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा (डायल 112) व्हॅनचे लोकार्पण आणि सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचेही उद्घाटन पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री प्रा. गायकवाड यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्कार, वन जमिनीच्या मालकी हक्क प्रमाणपत्राचे, पोलीस विभागामार्फत उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्हाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले. यावेळी शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुर्यकांत कडेलवार, शिक्षणकाधिकारी (प्राथ.) संदिपकुमार सोनटक्के, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह लोक प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.