प्रशासकीय

जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबध्द – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

आठवडा विशेष टीम―

उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र दिनी मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

भंडारा, दि. 1 मे : आज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा 62 वा वर्धापन दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. महाराष्ट्र हे सुरवातीपासूनच विविध क्षेत्रात अग्रणी असलेले राज्य आहे. गत दोन वर्षात कोरोनावर मात करत जिल्ह्याने विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी विद्यमान शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी आज केले.

पोलिस मुख्यालय येथे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, पोलिस अधीक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आज महाराष्ट्र दिनासोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिन पालकमंत्री श्री. कदम यांनी जिल्ह्याच्या विकास कामांचा प्रगतीपर आढावा यावेळी सादर केला. माझी वसुंधरा अभियानात राबविलेल्या सायकल परेडबाबत पालकमंत्र्यांनी प्रशासन व नागरिकांचे कौतुक केले.

गोसेखुर्दसाठी अर्थसंकल्पात 853 कोटी इतक्या भरीव निधीच्या तरतुदीव्दारे डिसेंबर 2023 पर्यंत हा प्रकल्प पुर्ण करण्याचे नियोजित असल्याचे त्यांनी सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत 34 बाधित गावांपैकी 31 गावांचे पुनर्वसन झाले असून उर्वरीत कामे ही वेगाने सुरू असून लवकरच ते पुर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरूणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी अंमली पदार्थ वापर प्रतिबंध समितीव्दारे जिल्ह्यात चांगले काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालकांच्या हितासाठी आघाडी शासन प्रयत्नरत आहे. कोरोना काळात निराधार झालेल्या 88 माता भगिनींना सह्याद्री फौंडेशनच्या माध्यमातून प्रत्येकी 30 हजार रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले. तर 14 बालकांना रूपये 5 लक्ष इतकी रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे नावे काढण्यात आलेल्या संयुक्त खात्यावर जमा झाले असून संबंधित बालकांचे नावे एकरक्कम रूपये 5 लक्ष मुदतठेव काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र दिनी यांचा झाला सत्कार : कोविड विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्यावर असतांना मृत्यू आलेल्या मुलचंद मंगल बेसरे यांच्या पात्र वारसांना सानुग्रह अनुदान 50 लक्ष रूपये वितरीत  करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार अमरी. एल. पारधी तलाठी, पेंढरी यांना देण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानतर्गंत राष्टसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे जिल्हास्तरीय पुरस्कार यासह पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना ही सन्मानित करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सामाजिक न्याय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत तसेच समाजमाध्यमांव्दारे या योजनाचा प्रचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button