नियोजनानुसार कामांना चालना देण्यासाठी मान्यता व इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण करा

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 1 : जिल्हा नियोजन समितीच्या चालू वर्षाच्या नियोजनानुसार अपेक्षित कामांचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करावी. अपेक्षित कामे नियोजनानुसार पूर्ण होण्यासाठी वेळेत कार्यवाही व्हावी, असे निर्देश वित्त व नियोजन, गृह, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिले.

गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक शासकीय विश्रामगृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री श्री. देसाई यांनी वित्त व नियोजन,  गृह, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता आदी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, पोलीस आयुक्त आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत सातव, एम. एम. मकानदार,राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधिक्षक ज्ञानेश्वरी आहेर,  जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी  विसाळे, नरेंद्र येते, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, हर्षल चौधरी, जिल्हा रोजगार व कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले की, नियोजनानुसार अपेक्षित कामांवर निधी प्राप्त तो खर्ची पडण्यासाठी सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यात यावी. विविध विभागांकडून परिपूर्ण प्रस्ताव मागवून घ्यावेत. नियोजित कामांची निविदा प्रक्रिया काटेकोरपणे व वेळेत राबवावी. नियोजन विभागाने सर्व विभागांकडून ही प्रक्रिया करून घ्यावी जेणेकरून अपेक्षित विकासकामांना वेळेत चालना मिळेल, असे निर्देश त्यांनी दिले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तमोत्तम प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. व्यावसायिक अभ्यासक्रमांत विद्यार्थिनींचे प्रमाणही वाढले पाहिजे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना नोकरी मिळण्यासाठी रोजगार मेळाव्यासारखे उपक्रम सातत्याने राबवावेत, असेही निर्देश त्यांनी दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. गृह विभागाच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी बैठकीद्वारे घेतला.

महाआरोग्य अभियान, रोजगार व कौशल्य विकास विभागाच्या योजनांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मेळावे घेऊन युवकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.