दिमाखदार सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ‘महाराष्ट्र दिन’ उत्साहात साजरा

आठवडा विशेष टीम―

नवी दिल्ली,१: महाराष्ट्र राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त आज महाराष्ट्र सदनात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भूपाळी, वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, भारूड, गौवळण, लावणी, कोळीनृत्य आदी समृद्ध लोककलांच्या दमदार सादरीकरणाने राज्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडले.

कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त (अ.का.) डॉ. निरुपमा डांगे  यांच्या हस्ते उद्घाटन  झाले. यावेळी सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  उपस्थित  होते.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनानेही महाराष्ट्र दिनाच्या औचीत्याने राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारस्याचे दर्शन घडविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने कोल्हापूर येथील श्रीजा लोककला संस्थेच्या कलाकारांच्या चमूने यावेळी दमदार सादरीकरण केले.

महाराष्ट्राच्या लोककलांचे दमदार सादरीकरण

भूपाळीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहाटेचे दर्शन घडविणारे वासुदेव नृत्य तसेच पहाटे घरा-घरांमध्ये जात्यांवर दळण दळतांना गायल्या जाणाऱ्या ओव्यांचे सादरीकरण झाले.  मंगळागौरी सणाची झलकच यावेळी रंगमंचावर बघायला मिळाली. यावेळी मंगळागौरीची विविध गाणी गात त्यावर कलाकारांनी ठेका धरला. नारळी पोर्णिमेचा सण व कोळी बांधवांचा उत्साह दर्शविणारे कोळीगीतांचे सादरीकरणही  झाले. वारकरी संताचे  प्रसिद्ध भारूडही यावेळी सादर झाले.

लावणी, गवळण, शेतकरी नृत्य, खानदेशी नृत्य, धनगर नृत्य, जोगवा या लोककलांच्या सादरीकरणाने येथे उपस्थित रसिक प्रेक्षकांची दाद मिळविली.

राज्यातील आदिवासी जमातीचे दर्शन घडविणारे नृत्य, वाघ्या-मुरळी आदींनी रसिकांच्या टाळ्या मिळविल्या. विविध लोककला व लोकनृत्यांच्या आविष्काराने सजलेल्या या  कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे  प्रति‍बिंबच उभे राहिले आणि यास उपस्थितांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.