उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 2 : “ईद-उल-फित्र तथा रमजान ईद सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो. रमजान ईदच्या निमित्ताने वंचित बांधवांना मदत करुन त्यांच्या जीवनात आनंद आणूया. यंदाची ईद एकोप्याने, आनंदाने, उत्साहाने साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रमजान ईदनिमित्ताने दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होतो. मुस्लिम बांधवांच्या बरोबरीने सर्वधर्मीय बांधव ईदच्या आनंदात सहभागी होतात. दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात साजरी होणारी रमजान ईद समाजात आनंद, उत्साहाचे वातावरण घेऊन येईल. देशवासियांमध्ये एकजुटीची, सहकार्याची, बंधुत्वाची भावना वाढीस लावेल. ही भावनाच महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.