राज्य शासनाची विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेले प्रदर्शन उपयुक्त

आठवडा विशेष टीम―

पुणे, दि. 2 : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी भरवलेले ‘दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची’ हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. त्याबद्दल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महासंचालनालयाचे अभिनंदन, अशा शब्दात सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रदर्शनाच्या आयोजनाबद्दल कौतुक व्यक्त केले.
राज्यमंत्री श्री. भरणे यांनी आज प्रदर्शनाला भेट देऊन सर्व चित्रमय फलकांवरील माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, कोरोना काळातही शासनाने विकासकामांमध्ये खंड पडू दिला नाही. त्याचाच प्रत्यय प्रदर्शन पाहिल्यावर येतो. प्रदर्शनात सचित्र माहिती देण्यात आलेल्या योजना सर्वसामान्यांना अतिशय उपयुक्त असून लोकप्रतिनिधी, सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन सरकारने केलेल्या कामांची माहिती घ्यावी. त्याआधारे योजनांच्या लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री श्री. भरणे यांनी राज्यातील जनतेला रमजान ईद आणि अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छाही दिल्या. श्री. भरणे यांनी यावेळी 360 अंश सेल्फी घेतली. डॉ. पाटोदकर यांनी मंत्रीमहोदयांना प्रदर्शनातील फलकांची माहिती दिली.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची प्रदर्शनाला भेट

या प्रदर्शनाला खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, शिरुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार, मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप यांनी भेट देऊन माहिती घेतली तसेच शासनाने दोन वर्षात उत्कृष्ट काम केले असून ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरत आहे अशा भावना व्यक्त केल्या.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.