प्रशासकीयब्रेकिंग न्युज

छायाचित्र प्रदर्शनातून शासकीय योजना व उपक्रमांच्या माहितीची प्रभावी मांडणी

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि.3 : विकास कामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनामध्ये शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे मांडली आहे. या उपक्रमाला नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी ,असे आवाहन पोलिस आयुक्त श्रीमती आरती सिंह यांनी आज येथे केले.

राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांत राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि  विकासकामांची माहिती देणाऱ्या सचित्र प्रदर्शनाचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित करण्यात आले आहे. आज या प्रदर्शनाला  आरती सिंह यांनी भेट देऊन पाहणी केली . विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक हर्षवर्धन पवार, माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यावेळी उपस्थित होत्या.

शासनाच्या योजना व त्याची फलश्रुती प्रदर्शनातून सचित्र सादर करण्यात आली आहे. गृह विभागातर्फे डायल ११२ सारखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आयुक्तालय स्तरावरही पोलीस विभागाकडून अनेकविध उपक्रम राबविण्यात येतात. असे उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा स्तरावरही असे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पोलीस आयुक्त श्रीमती सिंह यांनी यावेळी केली.

अमरावती विभागाचे प्रदर्शन संत ज्ञानेश्वर सभागृह येथे सुरु असून ते 5 मे पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे. ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती चित्रमय प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहे .  या प्रदर्शनामध्ये राज्यासोबतच अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा  स्वतंत्ररित्या  समावेश करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारने  विविध विकासकामे केली असून कोरोना महामारी आणि अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला आहे. राज्य शासनाने सर्वसामान्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी विविध योजना राबविल्या असून या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी, या उद्देशाने राज्यातील विविध ठिकाणी ही प्रदर्शने आयोजित केली आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन माहिती  नागपूर-अमरावती  विभाग संचालक हेमराज बागुल  तसेच प्र. उपसंचालक हर्षवर्धन पवार यांनी केले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button