नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी उपक्रम कौतुकास्पद

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनातून शासनाच्या विविध विभागांकडून राबविण्यात येणा-या योजना- उपक्रमांची माहिती नागरिकांना मिळते. छायाचित्रांच्या माध्यमातून थेट नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार अनाथ व दिव्यांगांचे आधारवड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी आज येथे काढले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाने राबविलेल्या विविध विभागाच्या विकासात्मक योजनांवर आधारित ‘दोन वर्षे जनसेवेची,महाविकास आघाडीची’ राज्यस्तरीय  छायाचित्र प्रदर्शन  शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहातील आर्ट गॅलरीत सुरु आहे. त्याला आज श्री. पापळकर यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.  आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, प्र. माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, कलावंत व शिक्षिका दीपाली बाभुळकर, निवेदिका क्षिप्रा मानकर आदी यावेळी उपस्थित होते.

प्रदर्शनात राज्यातील सर्वच विभागांचा समावेश असल्याने अनेक नवी माहिती जाणून घेता आली. स्वमग्नतेचा आजार असलेल्या मुलांसाठी स्वमग्नता उपचार व पुनर्वसन केंद्रासारखा (ऑटिझम सेंटर) उपक्रम लातूर जिल्ह्यात राबवला जात आहे. त्याची माहिती मिळाली. अशी केंद्रे इतरत्रही सुरू व्हावीत, अशी अपेक्षा श्री. पापळकर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या दुस-या टप्प्यात कलावंत दीपाली बाभुळकर यांनी बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग सादर केला. शासन संवाद, योजनांची माहिती, आरोग्य शिक्षण आदींबाबत माहिती त्यांनी प्रयोगाच्या माध्यमातून दिली. त्याला नागरिकांसह विद्यार्थी व लहान मुलांनी मोठा प्रतिसाद दिला. माहिती अधिकारी अपर्णा यावलकर यांनी आभार मानले. माहिती सहायक पल्लवी धाराव यांनी सूत्रसंचालन केले. हे प्रदर्शन दि. 5 मेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.