पत्रकारितेचे वैभव तुम्ही हाताळणाऱ्या विषयांवरच अवलंबून

आठवडा विशेष टीम―

नागपूरदि. 03 : प्रिंटमध्ये व्यक्त व्हायचे की इलेक्ट्रॉनिक्स मिडियावर स्वार व्हायचे, की डिजिटल माध्यमांतून लाखोंपर्यंत पोहचायचे ही सर्व माध्यम निवड आहे. मात्र, पत्रकारिता आणि पत्रकारितेचा पाया असणारी बातमी, तिचा विषय हा तुमच्या संवेदनशिलतेचा, प्रामाणिकतेचा, जाणिवांचा आणि बांधिलकीचा अर्क असतो. तुमच्या विषयाच्या निवडीवरच माध्यम कोणतेही बदलले तरी पत्रकारितेचे वैभव अवलंबून असेल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, पत्र सूचना कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर आणि नागपूर प्रेस क्ल्ब यांच्या  संयुक्त विद्यमाने मंगळवारी सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबच्या सभागृहात “वर्ल्ड प्रेस फ्रिडम डे” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘डिजिटल युगाच्या परिघात पत्रकारिता’ या विषयावर तज्ज्ञांनी विचारमंथन केले.

यावेळी अध्यक्षस्थानी सर्वोच्च न्यायालयचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमुर्ती वि.एस. सिरपूरकर होते. राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ.राऊत म्हणाले, शाश्वत पत्रकारिता ही विश्वासार्हतावर अवलंबून असते. तुमच्या एका बातमीमुळे लाखो लोकांच्या जिवनात आमुलाग्र बदल घडून आणण्याची ताकद असते. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता ही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स व आजच्या डिजिटल माध्यमातही उजवी ठरते. कारण त्यांचा हेतू प्रामाणिक होता. एकसंघ भारत, भेदभावविना भारत, सुशिक्षित भारत, सुसंस्‌कृत भारत उभारण्यासाठी त्यांनी पत्रकारितेत आपला अमूल्य वेळ दिला.  बाबासाहेब लोकशाहीच्या चारही स्तंभात दिसून येतात. त्यांनी नौकरशाहीमध्ये कसे काम करावे हे बडोद्यात सिद्ध केले. कायदेमंडळात कसे काम करावे हे मंत्री म्हणून सिद्ध केले. उदरनिर्वाहासाठी न्यायव्यवस्थेत निष्णांत कायदेपंडीत म्हणून ते जगापुढे आहेत. आणि पत्रकारिता काय असते ते मूकनायक ते प्रबुद्ध भारत यातील परिवर्तनवादी पत्रकारितेने सिद्ध केले. पुढील काळात अभिव्यक्त होण्याचे माध्यमे बदलतील. मात्र, बातमीमागील प्रामाणिक हेतू, सत्य, संवेदनशिलता कधीही बदलणार नाही, असेही डॉ.राऊत यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्यायमुर्ती वि.एस. सिरपूरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारितेत तुमचा प्रवेश आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी होऊ नये. तुम्ही पत्रकार आहात म्हणून लोकांनी तुम्हाला घाबरले पाहिजे असा काळ आता राहिला नाही. मिडिया ट्रायल करु नका. समाजाच्या भल्यासाठी पत्रकारितेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल असे वागू नका असा सल्ला दिला. ते म्हणाले अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या शब्दांशी आपली गाठ असते. त्यामुळे अशा कोणत्याच शब्दांबद्दल पुढे पश्चाताप होणार नाही, असे निकोप लिखान करा.

राज्य माहिती आयोग, नागपूर खंडपीठाचे आयुक्त राहुल पांडे यांनी बदलत्या तंत्रज्ञानाचे स्वागत करताना नवे डिजिटल माध्यम कोणाच्या हातात आहे. हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांची विश्वासार्हता जाऊन अनागोंदी व्हावी अशा विचारसरणीच्या हातात माध्यमे तर नाही ना? अशी शंका निर्माण झाली पाहिजे. डिजिटल तंत्रज्ञानात अनुभवी पिढीने आपली विश्वासार्हता, लोकमान्यता रुजवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल यांनी यावेळी जागतिक स्तरावर माध्यमांमध्ये होत असलेल्या बदलांचा आढावा घेतला. ते म्हणाले आपल्या जगण्यातील कोणतेच क्षेत्र आता डिजिटल क्रांतीपासून अलिप्त राहिले नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांचाही यापुढे सकारात्मक विचार करावा लागेल. काही घटकांकडून होत असलेल्या समाज माध्यमांच्या चुकीच्या वापरामुळे माहितीच्या प्रसारणात अनिष्ट बाबींचा प्रसार होत आहे. यासाठी विवेकभान राखून या माध्यमांचा वापर करावा लागेल, असे  त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी यावेळी लोकशाहीच्या चारही स्तंभाचे कशाप्रकारे अवमूल्यन झाले हे सोदाहरणासह स्पष्ट केले. अशावेळी माध्यमांनी डिजिटल माध्यमांचे मालकत्व कोणाकडे या बाबीला गंभीरतेने घेणे आवश्यक आहे. लोकांचा टॉकटाईम कमी झाला, स्क्रीन टाईम वाढला, माध्यम बदललं, अशा वेळी मालक कोण हे लक्षात घेणे गरजेचे आहे. माध्यमांनी जनतेचे न्यायधीश न बनण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी आपल्या भाषणामध्ये लोकप्रियतेच्या नावावर किती लाईक्स भेटतात या गणितापुढे पत्रकारितेच्या संवेदनशीलतेचा बळी जाऊ नये अशी भिती आपल्या दिर्घकाळातील पत्रकारितेचे दाखले देत व्यक्त केली. नकारात्मक वृत्तांना अधिक लाईक भेटणाऱ्या माध्यमांना आदर्श मानायचे का? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर क्षेत्रिय लोक संपर्क ब्यूरोचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी केले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार, माध्यमातील तज्ज्ञ, चिकित्सक तसेच पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.