नोंदणी केलेल्या उमेदवारांना रोजगार देण्याचे परिपूर्ण नियोजन करा- पालकमंत्री बच्चू कडू

आठवडा विशेष टीम―

अकोला दि.4(आठवडा विशेष)- जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या रोजगार नोंदणी पंधरवाड्यात नोंदणी केलेल्या रोजगार इच्छुक युवक युवतींकडून प्राप्त माहितीचे विश्लेषण करून त्यांना रोजगार देण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री रोजगार नोंदणी पंधरवाड्यातील नोंदणी संदर्भात आज दुपारी आढावा सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपवनसंरक्षक के.अर्जुना, किमान कौशल्य व उद्योजकता विभागाचे  सहायक संचालक आर.डी. ठाकरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून रोजगार नोंदणी पंधरवाडा दि.14 एप्रिल ते दि. 1 मे या कालावधीत राबवण्यात आला. यात जिल्ह्यात 57 हजार 21 जणांनी नोंदणी केली. त्यात मनपा क्षेत्रातील 7228, ग्रामीण भागातून 37 हजार 577, नगर पालिका क्षेत्रातून 12 हजार 216 याप्रमाणे सहभाग आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यासर्व नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या नोंदणीचे विश्लेषण करून त्यानुसार, रोजगार देण्याबाबत परिपूर्ण नियोजन करावे,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. नोंदणी केलेल्या युवक युवतींच्या नोंदणीचा प्राधान्यक्रम तसेच पसंतीक्रमानुसार त्यांचे आवश्यक प्रशिक्षण इ. बाबत नियोजन करावे. उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करावे. यासंदर्भात लवकरच मेळावा आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून कंपन्या दाखल होतील. रोजगार नोंदणीतून प्राप्त अर्जांच्या आधारे त्या कंपन्यांतून रोजगाराची संधी जिल्ह्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षण व कौशल्याच्या आधारे देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

0000

बांबू लागवडीचे नियोजन करावे – पालकमंत्री कडू

अकोला,दि.4(आठवडा विशेष)- बांबू हे आर्थिक उत्पन्न देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ही उपयुक्त असे पीक आहे, त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी बांबू लागवडीचे नियोजन करावे,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले.

रोजगार हमी योजनेतून शासकीय जमिनींवर बांबू रोपांची लागवडीचे नियोजन करण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, उपवनसंरक्षक के.अर्जुना आदी तसेच सर्व गटविकास अधिकारी, तहसिलदार  उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी निर्देश दिले की, जिल्ह्यातील इ क्लास जमिनीची माहिती संकलित करावी. गावनिहाय या जमिनींवर पर्यावरण संवर्धन तसेच त्या त्या गावातील युवक युवतींना रोजगार मिळावा या हेतूने तेथे बांबू लागवडीची शक्यता पडताळण्यात यावी. यात दिव्यांग व्यक्तिंना प्राधान्य द्यावे. तसेच शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर बांबू लागवडीस चालना द्यावी. जेणे करून ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा,तसेच पर्यावरण संरक्षण व्हावे, पावसाचे पाणी अडविण्यासाठीही त्याचा उपयोग होईल,अशी सूचनाही त्यांनी केली. येत्या पावसाळ्यात हे अभियान राबविता यावे यासाठी रोपांची उपलब्धता करण्याबाबतही त्यांनी वनविभागास सुचना केली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.