‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ चित्रमय प्रदर्शनामुळे राज्याच्या विकासाचे चित्र डोळ्यासमोर उभे

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 4 : ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हे चित्रमय प्रदर्शन शासनाची कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम माध्यम आहे. याद्वारे महाराष्ट्राच्या विकासाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्य शासनाच्या दोन वर्षाच्या कामगिरीवर आधारित चित्रमय प्रदर्शनाचे मुंबईतील जुहू बिच परिसरात आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. येथे भेट दिल्यानंतर नागरिक अत्यंत समाधानाने शासनाच्या कामगिरीकडे पाहत असल्याचे दिसून येत आहे.

महाविद्यालयीन तरूणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद लाभलेल्या या चित्र प्रदर्शनाचे सोप्या, सुटसुटीत भाषेत आणि कल्पकतेने आयोजन केल्याने आम्हाला शासनाच्या सर्व विभागांच्या निर्णयांची माहिती एका छताखाली मिळाली, अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्यक्त होत आहे. केरळ लोकसेवा आयोगातून उपसचिव पदावरून निवृत्त झालेले पी.ओ. जोस सध्या सहकुटुंब मुंबई फिरण्यासाठी आले आहेत. प्रदर्शन पाहून त्यांनी समाधान तर व्यक्त केलेच शिवाय मुख्यमंत्री आणि शासनाला धन्यवाद दिले. कोलकाताचे सुशील दास सध्या मुलीच्या शिक्षणासाठी मुंबईत आहेत. त्यांनीही शासनाच्या कामाचे कौतुक करून खास बंगाली भाषेत प्रतिक्रिया नोंदविली.

आपल्या लग्नाचा ४५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जुहू येथे आलेल्या मुलुंडच्या सतीश कोठारी दांपत्याने शासनाच्या कामगिरीचे प्रदर्शन आहे हे लक्षात आल्यानंतर वेळ काढून आवर्जून भेट दिली. येथे भेट देऊन आनंद वाटला आणि चांगली माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदविली. नोकरी करणाऱ्या शिवप्रकाश याने शासनाचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तर, स्वराज गाडगे याने प्रदर्शन पाहिल्यानंतर शासनाचे काम उत्तम असल्याची प्रतिक्रिया नोंदवून हे कार्य पुढील तीन वर्षे असेच सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत  शासनाच्या विविध योजना व विकासाकामांवर आधारित हे चित्रमय प्रदर्शन दि. 5 मे पर्यंत सर्वसामान्यांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.