परळी दि.१६: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना अठरा पगड जाती धर्माच्या, बारा बलुतेदार लोकांना सोबत घेवून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शाहु, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्रित करून न्याय मिळवून दिला. तोच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. राजकारणात मला जातपात मान्य नसून लोकसभा निवडणूकीत बीड जिल्ह्यात हे घडतं हे दुर्देव आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे घराण्याचे आणि आमचे कौटूंबिक स्नेह अनेक वर्षापासूनचे असुन मुंडे साहेबांनी बहुजनासाठी आयुष्य वेचले. रायगडावर असो किंवा दिल्लीत शिवरायांच्या जयंतीला मुंडे साहेब सहकार्य करायचे. ना. पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ. प्रितमताई मुंडे ह्या माझ्या भगिनी असुन लोकसभा निवडणूकीत प्रितमताईला शुभेच्छा देण्यासाठी मी खास परळीत आल्याचे खा.छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. विनायक मेटेंच्या प्रश्नांवर ते म्हणाले मेटे आणि छत्रपती तुलना होऊ शकत नाही म्हणून ते कांहीच बोलले नाहीत.
बीड लोकसभा निवडणूकीतील महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजे काल जिल्ह्यात आले होते. परळीत यशःश्री निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरूवातीलाच बोलताना ते म्हणाले की, मुंडे घराण्याचे आणि आमचे जुने संबंध आहेत. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला एकत्र करण्यासाठी मी राज्यात ज्या वेळी शिवशाहू दौरा काढला त्यावेळी स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी माझ्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. भगवानगडावर ही मला बोलावले होते. राजकारण जातीपातीच्या पलिकडे जावून केले पाहीजे. माणसं जोडली पाहिजेत. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे. या भूमिवर जातीपातीचं राजकारण हे दुर्देव असुन बीड जिल्ह्याच्या राजकारणात असं घडायला नको आहे. गोपीनाथराव मुंडे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, साहेबांच्या निधना अगोदर माझी त्यांची भेट झाली होती. रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याला ते येणारही होते. मात्र सहज बोलताना त्यांनी माझ्या मुलीकडे लक्ष ठेवा सांगितल्याची आठवण त्यांना झाली. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्यांच्या पाठीमागे भावाप्रमाणे खंबीरपणे उभा आहे आणि त्यामुळेच शुभेच्छा देण्यासाठी परळीत आलो. आपण या निवडणुकीत प्रचारात सहभागी नाहीत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सांगितले मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. पण भाजपाचा सहयोगी सदस्य आहे. माझे समर्थन भाजपाला आहे. देशात नरेंद्र मोदी यांची सत्ता महत्वाची आहे. मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच आहे आणि ते व्हावेत. जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा विकासाचा विचार हा खर्या अर्थाने बहुजन समाजाच्या कल्याणासाठी महत्वाचा आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, सरकारने आरक्षण दिले आहे. कांही त्रुटी भरून काढण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू असुन कायद्याच्या चौकटीत मजबुती यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. सर्वांनाच आरक्षण मिळाले पाहिजे असे ही त्यांनी सांगितले.
बीडकरांनो जातीपातीचे राजकारण करू नका
बीड जिल्ह्यातील जनतेला निवडणूक पार्श्वभूमीवर आवाहन करताना त्यांनी सांगितले की, जातीपातीच्या राजकारणापेक्षा बहुजनांच्या हितासाठी विकासाचे राजकारण महत्वाचे आहे. तसेच बहूजन समाज एकत्रित रहावा यासाठी स्व. गोपीनाथराव मुंडे आणि आम्ही सोबत काम केलेले आहे. यामुळे जातीपाती फुट पाडणार्यांना न मतदान करता विकासाला मतदान द्या असे म्हणत डॉ. प्रितमताई मुंडे यांना शुभेच्छा दिल्या.
दोन्ही राजे मुंडे भगिनींच्या पाठीशी
स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त आम्ही दोन्ही छत्रपती एकत्र आलो होतो. खा.छत्रपती उदयनराजेंचे मुंडे भगिनींवर प्रेम आहे म्हणून त्यांची भूमिका ही स्पष्ट आहे असे म्हणत खा. संभाजीराजे यांनी मुंडे भगिनींच्या पाठीशी राहण्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी राजांनी डॉ. प्रितमताई मुंडेंना पुष्पगुच्छ देवून निवडणूक विजयासाठी शुभेच्छा दिल्या.