विकासाचा कलश घेऊन आलेल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरा – ना.पंकजाताई मुंडे
अतिविराट सभेने खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब ; धोधो पावसातही मतदारांची मोठी उपस्थिती
परळी दि.१६: खा.डॉ. प्रितमताई मुंडे ही आपली लेक असुन साडेचार वर्षात तिने लक्ष्मीच्या रुपाने जिल्ह्यात विकासाचा सुवर्ण कलश आणला आहे. आपण आपल्या लाडक्या लेकीची मतदानाने ओटी भरून तिला भरभरून आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले. राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ झालेल्या अतिविराट सभेने खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. धो-धो पाऊस सुरू असतानाही एकही नागरीक जागेवरून हलला नाही. वरूणराजाने हजेरी लावुन प्रितमताई मुंडे यांना आशीर्वादच दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संपविले तर आमच्या भावाने अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस संपवून टाकल्याचे डॉ. प्रितमताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भाजप-शिवसेना-रिपाइं- रासप- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ समारोपाची सभा राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे झाली. यावेळी ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, डॉ प्रितमताई मुंडे यांनी आपल्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात अतिशय भरीव असे विकास कामे केली आहेत. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आहे. मात्र विकास आंधळ्या विरोधकांना आम्ही केलेली प्रगती दिसत नाही असे सांगून डॉ. प्रितमताई मुंडे या उमेदवारीसाठी पात्र नसल्याची टीका केली जाते कारण त्यांच्या दृष्टीने गुंडगिरी, चोरी चपाटी ही पात्रता असल्याचा घणाघात त्यांनी केला. आम्ही भगिनींनी केलेली कामे बघून कौतुक करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब नसल्याने अनाथ झाल्यासारखे वाटते असे सांगून त्यांचा वारसा चालवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. मी आयुष्यात कोणाचे वाईट केले नाही आणि करणारही नाही. विरोधकांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी जनता सर्व ओळखून आहे. म्हणून आता जातीवादाचे विष पेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी विकास करताना कधी जात किंवा पक्ष पाहिला नाही. तुम्ही सुध्दा मतदान करताना केवळ विकास हाच मुद्दा समोर ठेवून विकासाची क्षमता असलेल्या प्रितमताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.
परळी शहर सुरक्षित,निर्भय आणि स्वच्छ करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. नगरपालिका माझी नसली तरीमी विकासाला निधी कमी पडू दिलेला नाही. पाणी पुरवठा योजना, रस्ते आदी कामांसाठी मोठया प्रमाणावर निधी दिला आहे. वैद्यनाथ देवस्थानच्या विकासासाठीही मी निधी उपलब्ध करून दिला असुन परळी दहशत आणि गुंडगिरीपासून मुक्त केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
त्यांनी आरोपाशिवाय काय केले?
आमच्या बंधूना केवळ मला विरोध करण्यासाठी विरोधी पक्ष नेत्याची झुल घातली असुन त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याशिवाय दुसरे कांहीही केले नाही. त्यांच्या सत्तेच्या काळात जिल्ह्यात एकही भरीव काम झाले नाही. कागदावर रस्ते दाखवुन बगलबच्चांना मोठे करण्याचे काम त्यांनी केले. यामुळे विकास खुंटला. या विकासाला गती देण्याचे काम मी आणि डॉ. प्रितमताई मुंडेंनी केले आहे. जिल्ह्यात मी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे असे सांगुन बारामतीकरांचे आपल्या जिल्ह्यावर प्रेम असते तर विकास झाला नसता का असा सवाल करून आईची माया दाईला येत नसते म्हणून आपली कन्या डॉ. प्रितमताई मुंडे यांना भरघोस मताने विजयी करून विकासाला साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.
भावाच्या सर्जिकल स्ट्राईकने राष्ट्रवादी उध्दवस्त- खा.डॉ.प्रितमताई मुंडे
यावेळी बोलताना खा.डॉ. प्रितमताई मुंडे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी संपविले तर आमच्या भावाने अख्खी राष्ट्रवादी उध्दवस्त केली आहे. उरली सुरली राष्ट्रवादी आगामी काळात ना. पंकजाताई मुंडे संपवुन टाकतील असे सांगुन आपण दिलेल्या घोषणा परळीच्या कानाकोपर्यात तर पोहोंचल्याच आहेत परंतु या घोषणांनी बारामतीच्या कानठाळ्या बसविल्या असे म्हणताच मतदारांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. ही सभा म्हणजे विजयाचा घंटानाद करण्यासाठी जमलेली जनता असल्याचे त्यांनी सांगितले. माझी पात्रता विचारणार्या विरोधकांनी त्यांच्या काळात काय कामे केली याचा हिशोब द्यावा असे सांगून पावणे तिनशे कि.मी. रेल्वे आणली. दहा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यात आणले. जिल्हा रुग्णालय सुसज्ज केले. अंबाजोगाईच्या दवाखान्यात सुविधा उपलब्ध करून दिल्या असा विकासाचा पाढा त्यांनी वाचला. मुंडे साहेबांच्या नावाची एवढीच अॅलर्जी आहे तर स्वतःच्या सर्वेसर्वाना बोलावून मुंडे साहेबांचे विचार मीच चालवतो असे कौतुक करून घेण्याची गरज का वाटली असा सवाल त्यांनी केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विकास होत आहे. त्यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि जिल्ह्याच्या पारदर्शक विकासासाठी मला पुन्हा ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ.अमितजी पालवे, भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्षा पप्पु कागदे, वंदे मातरम् सेनेचे दिलीप जोशी, शिवसेनेचे वैजनाथ सोळंके, राजा पांडे आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी, संचलन सचिन स्वामी यांनी तर आभार उमेश खाडे यांनी मानले.
यावेळी व्यासपीठावर भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा ईटके, विकासराव डुबे, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन, प्रकाश सामत, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, जीवराज ढाकणे, श्रीहरी मुंडे, गयाताई कराड, डॉ. शालिनी कराड, सुशिला फड, संचालक ज्ञानोबा मुंडे, पांडूरंग फड, सतीश मुंडे, केशव माळी, दत्ता देशमुख, शांतीलाल जैन, रिपाइंचे धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजयकुमार मेनकुदळे, प्रा. पवन मुंडे, दत्ता कुलकर्णी, माधवराव मुंडे, वैजनाथ जगतकर, रमेश गायकवाड, वहाजोद्दीन मुल्ला, शिवसेनेच शहर प्रमुख राजेश विभुते, रमेश चौंडे, भाऊराव भोयटे, रविंद्र परदेशी, शामराव आपेट आदींसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.