ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करु – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि.06 : जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय स्तरावर ऑक्सिजन प्रणाली, व्हेंटिलेटर्स, आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्धता आदी कार्यवाही गतीने राबविण्यात येत आहे. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इस्टिट्यूट येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती सयंत्रामुळे ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

मार्डी रोडस्थित श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इस्टिट्यूट येथे ऑक्सिजन निर्मिती सयंत्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीचे महासचिव सौरभ सन्याल, ह.भ.प. सचिनदेव महाराज, संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलचे  अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर, सुरेश जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कोरोना काळात संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात अल्पावधीत आरोग्य सुविधांचा मोठा विस्तार करण्यात आला. असे सांगून श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, ऑक्सिजनबाबत जिल्हा स्वयंपूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे ऑक्सिजन सयंत्र स्थापन करण्यात आले आहे. यामुळे एकाचवेळी शंभर रुग्णांना ऑक्सिजन पुरविणे शक्य होणार आहे. कोरोना संकट काळातील अडचणींवर आपण अथक प्रयत्नातून मात केली आहे. जिल्ह्यात आरोग्य विषयक विविध सुविधांची वेगाने निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. रुग्णालये, प्रयोगशाळा, ऑक्सिजन निर्मिती सयंत्र, लसीकरण मोहिम अशा कितीतरी गोष्टींना चालना देण्यात येत आहे. भविष्यात आरोग्य संकटाची संभाव्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्याप्रमाणे प्रत्येक ग्रामस्तरावरही ऑक्सिजनदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यावर भर देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नाने व पुढाकाराने संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलला ऑक्सिजन निर्मिती सयंत्र मिळण्यास मदत झाली. याबाबत श्रीमती ठाकूर यांनी श्री. गडकरी यांचे यावेळी आभार मानले.

श्रीमती ठाकूर यांनी यावेळी ऑक्सिजन निर्मिती सयंत्राची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करुन उपचार यंत्रणेचा आढावा घेतला. व आवश्यक साधनसामग्रीबाबत माहिती घेतली.

श्री. दिवे यांनी रुग्णालयाच्या उपचार पध्दतीबाबत प्रास्ताविकेतून माहिती दिली. या ऑक्सिजन सयंत्राची क्षमता 300 लीटर प्रती मिनीट आहे. याव्दारे सलग 24 तास ऑक्सिजनच्या 50 खाटांना व 100 रुग्णांना ऑक्सिजन देता येऊ शकते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री. सन्याल म्हणाले, कोरोनाचा मुकाबला आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी पीएचडी फॅमिली वेलफेअर फाऊंडेशन आणि पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स ॲड इंडस्ट्रीची सामाजिक शाखा ओरिफ्लेम ऑक्सिजन निर्मिती सयंत्र स्थापना करण्यासाठी पुढे आली आहे. व यातूनच आज ऑक्सिजन सयंत्र बसविण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल व रिसर्च इस्टिट्यूट येथे द्रारिद्य रेषेखालील रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. रुग्णांना योग्यवेळी उपचार मिळणे, हे संस्थेचे ध्येय आहे. कोरोना काळात रुग्णालयातर्फे अविरतपणे रुग्णसेवा कार्य सुरु होते. यामुळेच रुग्णालयाने नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. दररोज येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असल्याची माहिती डॉ. सावकर यांनी दिली.

देशभक्ती हिच खरी ईश्वर सेवा आहे. अध्यात्म व विज्ञानामुळे खऱ्या अर्थाने नवनिर्मिती होते, असे सांगून ह.भ.प. सचिन देव महाराज यांनी संस्थेला 1 लक्ष 14 हजार रुपयांच्या निधीचा धनादेश सुपूर्द केला. इतरांनीही आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर दिवे यांनी केले. संचालन संस्थेचे सचिव सागर पासेबंद यांनी तर आभार कोषाध्यक्ष मुकुंद वाईकर यांनी मानले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.