आठवडा विशेष टीम―
नवी मुंबई दि.06 :- शासकीय सेवेत आस्थापना विषयक बाबींची अद्यावत माहिती असणे आवश्यक असून त्या माध्यमातून प्रशासन गतिमान होण्यास मदत होते. यासाठी आस्थापना विषयक कार्यशाळा महत्त्वाची असल्याचे मत उपायुक्त महसूल श्री.मकरंद देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.
कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आस्थापना विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक माहिती प्रशासन श्री.गोविंद अहंकारी, सेवानिवृत्त अवर सचिव श्री.रा.ना.मुसळे प्रमुख पाहुणे म्हणन उपस्थित होते. कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी ., पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहूल भालेराव आणि माहिती व जनसंपर्क कोकण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शासकीय नस्तीमध्ये दडलेली मानवी समस्या काढतानाच प्रशासनात यशस्वी प्रशासक व्हावेत हा हेतू डोळयासमोर ठेवून कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.मुळे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या “आस्थापना विषयक मार्गदर्शिका मे 2022” या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
यावेळी श्री.देशमुख म्हणाले की, आस्थापना विषय काम करताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासननिर्णय, शासन परिपत्रक याबाबतीत अद्यावत असणे आवश्यक आहे. शासकीय प्रकरणे हाताळताना ही प्रकरणे न्यायालयीन दृष्टीकोनातून हाताळणे महत्वाची आहेत. त्यासाठी संबंधितांनी त्या प्रकरणांचा सखोल अभ्यास करावा.
श्री.मुसळे यांनी आस्थापने विषयीच्या प्रमुख मुद्यांवर तपशिलवार माहिती दिली. आस्थापना विषयक काम करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कर्मचाऱ्यांनी नियमांच्या चौकटीत राहून कसे काम करावे, वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले शासननिर्णय आणि परिपत्रकांचे सतत वाचन करुन कसे अद्यावत राहावे, अशा महत्त्वाच्या बाबीं विषयी मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामात आस्थापना विषयी विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. या प्रश्नांना श्री. मुसळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.