खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवा

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 06 : खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असून खाद्यपदार्थ नमुन्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सभागृहात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

सह आयुक्त (औषधे) विराज पवनीकर, सहायक आयुक्त (औषधे) नितीन भांडारकर, सहायक आयुक्त (अन्न) प्रशांत देशमुख, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद चौधरी, श्री. मानवतकर, निरज लोहकरे, मनीष चौधरी यावेळी उपस्थित होते.

ग्राहकांना सुरक्षित, निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने अन्न पदार्थ विक्रेते, हॉटेल्स आदी आस्थापनांची तपासणी करून अन्न नमुने घ्यावेत. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी विशेष सप्ताह आयोजित करून त्यांना अन्न पदार्थांची हाताळणी, स्वच्छता याविषयी माहिती द्यावी. अन्न पदार्थ तळण्याकरिता वापरल्या जाणाऱ्या तेलाविषयी नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना डॉ. शिंगणे यांनी यावेळी दिल्या.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या औषधी पेढींधारकांची अपील प्रकरणे निकाली काढण्यासाठी लवकरच नागपुरात सुनावणी घेण्यात येईल. त्यादृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, असे डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.

खाद्यपदार्थातील भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेची माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती श्री. पवनीकर यांनी दिली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.