प्रशासकीयब्रेकिंग न्युज

अनुसूचित जाती कल्याण समितीच्या दौऱ्याचा समारोप

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 6 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीच्या तीन दिवसीय दौऱ्याच्या आज तिसऱ्या दिवशी समारोप झाला. नागपूर सुधार प्रन्यास, पोलीस आयुक्त कार्यालयासोबत सकाळच्या सत्रात बैठकी केल्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसांच्या निरीक्षणांवर समितीने मतप्रदर्शन केले. जिल्हा प्रशासनाला त्यांच्या दौऱ्यादरम्यान आढळलेल्या निरीक्षणाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज शेवटची आढावा बैठक घेण्यात आली. समिती प्रमुख प्रणिती शिंदे, समितीचे सर्व सदस्य जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आर. विमला व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागपूर सुधार प्रन्यास सोबत झालेल्या आजच्या बैठकीमध्ये श्रम साफल्य मोहिमेतून नागपुरातील सफाई कामगारांसाठी नागपूर महानगरात घरे बाधण्यासाठी  महानगरपालिकेच्या समन्वयातून एनआयटीने पुढाकार घ्यावा, अशी सूचना करण्यात आली.

दरम्यान, गुरुवार, 5 मे पासून समितीच्या कामाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेचा आढावा रात्री उशिरापर्यंत घेण्यात आला.

शुक्रवारला समाज कल्याण विभागाअंतर्गत झालेल्या कामकाजाची प्रत्यक्ष  पाहणी केली. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, सावनेर, कामठी, कोराडी, दाभा आदी ठिकाणी भेट देऊन मागासवर्गीय उपयोजना क्षेंत्रांतर्गत शासकीय व अनुदानित शाळा, वसतिगृह, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद यंत्रणांकडून करण्यात आलेल्या योजनांच्या कामांना भेटी देण्यात आल्या.

शुक्रवारला दुपारी  समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात समितीच्या प्रमुख विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे व समिती सदस्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला.

आज शनिवारी समितीचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता. समिती प्रमुख प्रणिती शिंदे यांच्यासह समिती सदस्यांनी आज सकाळी दीक्षाभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.  आज सकाळच्या सत्रामध्ये पोलीस आयुक्त शहर, पोलीस अधीक्षक ग्रामीण,महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क नागपूर, विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर, उपसंचालक आरोग्य विभाग कार्यालय नागपूर, उपसंचालक शिक्षण विभाग यांचा आढावा घेतला.

त्यानंतर दुपारी १ वाजल्या नंतर गेल्या तीन दिवसांत झालेल्या कामकाजाचा समारोपीय आढावा घेण्यात आला. मागासवर्गीयांच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात बाबत जागरूक राहण्याची सूचना यावेळी करण्यात आली. बैठकीच्या समारोपाची सूचना उपसचिव प्रकाशचंद्र खोडलय यांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निलेश काळे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button