शास्त्रीय संगीत प्रसारासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार

आठवडा विशेष टीम―

पुणे दि.९- भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत करण्यात येईल आणि सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महोत्सव घेण्यात येईल, अशी ग्वाही  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

ते आज गणेश कला क्रीडा मंच येथे भारतरत्न पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित केलेल्या  संगीत महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पद्मविभूषण पं.हरिप्रसाद चौरसिया, पं. श्रीनिवास जोशी, पं.सारंगधर साठे, पं.प्रमोद गायकवाड, विदुषी सानिया पाटणकर, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर,  उल्हास पवार, संचालक विभीषण चवरे आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख पुढे म्हणाले की, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षात, कोरोनामुळे कार्यक्रम आयोजन शक्य झाले नाही, मात्र भविष्यात असे कार्यक्रम दिल्ली, गदग व मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. शास्त्रीय संगीत परंपरेला जपण्यासाठी शासनातर्फे आवश्यक प्रयत्न करण्यात येत असून, नव्याने आढावा घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक धोरणात शास्त्रीय संगीतासाठी विशेष बाबींवर विशेष  लक्ष देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकारांना विविध माध्यमातून सहकार्य करण्यात येईल व शासनाच्या ज्या योजना पं. भीमसेन जोशी यांच्या नावाने आहेत, त्यांचाही विस्तार करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी नमूद केले.

पंडीतजींनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि संपुर्ण देशात शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात नावलौकीक मिळविला. त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे यासाठी जन्मशताब्दीच्या निमित्ताने अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.  पंडीतजींच्या  नावाने होत असलेल्या महोत्सवाचा आनंद नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

——

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.