प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल स्पर्धांच्या बक्षीसासाठी पुढील वर्षापासून १ कोटी रुपयांचा निधी देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध खेळाप्रमाणे राज्यातील नवीन खेळाडूंना संधी मिळावी त्यासाठी शासनाकडून राज्यस्तरावर चार मोठ्या स्पर्धा भरविण्यात येतात. त्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो-खो व व्हॉलीबॉल यांचा समावेश आहे. या प्रत्येक स्पर्धेसाठी 75 लाख इतका निधी बक्षिसासाठी देण्यात येतो तो निधी पुढील वर्षापासून 1 कोटी रुपयांपर्यंत करण्यात येईल. चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात विभाग स्तरावरील क्रिडा संकुलासाठी 50 कोटी, जिल्हास्तरावरील क्रिडा संकुलासाठी 25 कोटी, तालुका क्रिडा संकुलासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाचे खेळाडू घडतील,असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

      इस्लामपूर येथील लोकनेते राजारामबापू क्रिडानगरी पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या 24 व्या युवा राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार मानसिंगराव नाईक, आशियाई व्हॉलीबॉल फेडरेशनचे कार्यकारी अध्यक्ष रामअवतार जाखड, प्रांताधिकारी संपत खिलारी, जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील, पी. आर. पाटील, भारतीय व्हॉलीबॉल संघाचे महासचिव अकी चौधरी, ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडु महमंद मुल्ला आदी उपस्थित होते.

      राज्यातील खेळाडूचे हित जपण्यासाठी राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूना वर्ग 1 व वर्ग 2 च्या नोकऱ्या त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार सरकारकडून देण्यात येत आहेत. असे सांगून, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विविध खेळामध्ये प्रविण्य असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबियांनी योग्य मार्गदर्शन व पाठबळ देणे आवश्यक आहे. खेळामध्ये लक्ष घातल्यानंतर शैक्षिणक नुकसान होईल या भावनेतून खेळाडुंची अडवणूक करु नये. कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये  कोणत्या खेळामध्ये प्राविण्य प्राप्त करण्याची क्षमता आहे. त्यानूसार त्याला प्रशिक्षण द्यावे, शासन खेळाडुंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच पण त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांना पाठबळ द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

      यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध स्पर्धा राज्यामध्ये भरविता आल्या नाहीत. उत्तमातील उत्तम खेळाडु आपल्या राज्यामध्ये आहेत. परंतु त्यांना संधी देता येत नव्हती. आता परिस्थिती बदलेली आहे. आता त्या दोन वर्षाचा बॅकलॉक भरुन काढावयाचा आहे. राज्यात आयपीएल, प्रो-कब्बडी स्पर्धांच्या धर्तीवर राज्यातही व्हॉलीबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. राज्यातील खेळाडुना विविध सवलतीही देण्यात येत आहे. राज्यातील सर्व खेळाडूंच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे.

      यावेळी गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलिबॉलच्या स्पर्धा भरविण्याचा मान यावेळी महाराष्ट्राला मिळाला आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून यामुळे येणाऱ्या पिढीला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा क्षेत्रात कामगिरी केल्यास थेट शासकीय सेवा करण्याची संधी शासन उपलब्ध करुन देते. त्यामुळे हे ही आता एक प्रकारचे करिअर झाले आहे. प्रो-लिग कब्बडी प्रमाणे, प्रो-लिग व्हॉलीबॉल स्पर्धाही येत्या काळात भरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.

      प्रास्ताविक महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी केले. यावेळी आमदार मानसिंग नाईक, रामअवतार जाखड यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

      प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलन करुन क्रिडा ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या अभिनंदन धामणकर याने क्रिडा शपथ दिली. या स्पर्धेत विविध राज्यातील 22 पुरुष व 20 महिला संघांनी सहभाग घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button