शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 10 : राज्यातील शेतकरी बांधवांना खरीप हंगाम-2022 मध्ये दर्जेदार, प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा करावा, बियाण्यांची उपलब्धता, पुरवठा सुरळीत व्हावा, सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता गृहीत धरून सोयाबीनच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करावे, तेलबियांच्या बियाणांची उपलब्धता वाढवावी, योजनांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या बीज प्रकल्पांना गती द्यावी, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येऊ नये यासाठी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

खरीप हंगाम 2022 मधील बियाणे उपलब्धता व पुरवठा, बीजोत्पादनाची आढावा बैठक कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धीरज कुमार, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक रूचेश जयवंशी, कृषी संचालक दिलीप झेंडे, कृषि विद्यापीठ, महाबीज, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यातील शेतकरी बांधवांना दर्जेदार, प्रमाणित बियांण्यांचा पुरवठा करावा, कोणत्याही शेतकरी बांधवांची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीनला दर मिळत असल्याने पेरा वाढण्याची शक्यता असून त्यासाठी बियाण्यांची उपलब्धता वाढविण्यात यावी. खरीप हंगामात खोडमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता गृहीत धरून खोडमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना कराव्यात. प्रयोगशाळांना सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, महाबीज यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.

राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कापूस ही प्रमुख पिके घेतली जातात. बियाणे हा शेतीमध्ये शाश्वत उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठीचा महत्त्वाचा घटक आहे. खरीप हंगाम 2022 मध्ये प्रमुख अन्नधान्य पिकांचे 146.85 लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. या क्षेत्रावरील पेरणीसाठी बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार अन्नधान्य पिकांच्या 17.95 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बियाणे गरजेच्या तुलनेत महाबीज 1.72 लाख क्विंटल, राष्ट्रीय बीज निगम 0.15 लाख क्विंटल, खाजगी उत्पादकामार्फत 18.01 लाख क्विंटल, असे एकूण 19.88 लाख क्विंटल बियाणे या संस्थांकडून उपलब्ध होणार आहे.

—-०००—–

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.