आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि.12 : विदर्भातील सहकारी साखर कारखान्यांच्या अडीअडचणींवरील उपाययोजना आणि कारखान्यांना टिकविण्यासंदर्भात धोरण आखण्यासाठी शासन स्तरावर अभ्यास समिती गठित करण्याचे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
जय किसान सहकारी साखर कारखाना लि., बोदेगाव, ता.दारव्हा, जि.यवतमाळ सुरु करण्याबाबत श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी श्री.पाटील बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री माणिकराव ठाकरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले, शेतकरी हितासाठी विदर्भातील सहकारी साखर कारखाने टिकविणे गरजेचे आहे. यावर्षी राज्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. या भागातील सहकारी कारखान्यांच्या समस्या, अडीअडचणी सोडवून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे. सन 2009 पासून बंद असलेला बोदेगाव येथील जय किसान सहकारी साखर कारखाना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात असून हा कारखाना विक्री/ भाडेतत्वावर देण्याकरिता 2017 व 2022 मध्ये निविदा मागविण्यात आली होती. परंतु निविदा प्राप्त झालेली नव्हती. सद्यस्थितीत हा कारखाना विक्री/ भाडेतत्वावर देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत निविदा सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. इच्छुक संस्था, कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांना सवलती देण्याबाबत शासन सहकार्य करेल.