सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने सुधारित प्रस्ताव सादर करावा

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 12 : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीतील गाळ काढण्यासाठी सीआरझेडची परवानगी आवश्यक आहे. यासाठी बाणकोट खाडी परिसरातील नौकानयन सुलभ होण्याच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

सावित्री नदीच्या मान्सूनपूर्व तयारीचा श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा घेण्यात आला. यावेळी पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, स्थानिक आमदार भरत गोगावले, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री. गौतम, पूर नियंत्रण समिती रायगड चे सदस्य आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

महाड जवळ बाणकोट खाडीत नौकानयन सुलभ होण्यासाठी मेरीटाईम बोर्ड आणि राजेवाडी ते केंबुर्ली या भागात सावित्री नदीतील गाळ आणि बेटे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने स्वतंत्र प्रस्ताव सादर केले होते. यातील मेरीटाईम बोर्डाच्या प्रस्तावास महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीमार्फत मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सीआरझेड मधील तरतुदींनुसार मेरीटाईम बोर्ड मार्फत सुधारित प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.