संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शोक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. १३:- प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजूआत्यावर विशेष लोभ होता व संजूआत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!”
000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.