शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

आठवडा विशेष टीम―

नागपूर, दि. 14 : देशाची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहाय्याने शेती केल्यास त्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्नात वाढ होईल, असे  प्रतिपादन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी शेतकरी उत्पादन कंपनीच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाच्या भाषणात केले.

या कार्यशाळेचे आयोजन स्व. वसंतराव नाईक सभागृह (वनामती) येथे करण्यात आले होते.  जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, समाजकल्याण सभापती नेमावली माटे,  शेतकरी उत्पादक कंपनीचे मार्गदर्शक दीपक झंवर, अमिताभ मेश्राम, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद आकरे, कृषी विकास अधिकारी जयंत कऊटकर, किशोर बोराटणे आदी उपस्थित होते.

शेतकरी उत्पादक कंपनीला शासनाचे कोणतेही बंधन नसून सर्वाधिकार असल्यामुळे कंपनीच्या माध्यमातून शेतीविषयक सर्व कामे व यंत्रसामुग्री खरेदी केल्यास सभासदांना त्याचा फायदा होईल. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होऊन यांत्रिकीकरणाचा नेमका उपयोग कसा करायचा हे शिकता येईल. कंपनीचे व एकत्रित प्रयोगाचे फायदे असतात.अमरावती जिल्ह्यात पोहरा येथे गोट बिडींग फार्म 250 एकर जमिनीवर तयार करण्यात आला आहे, त्याच धर्तीवर रामटेक तालुक्यात गोट बिडींग फार्म तयार करण्यात येणार असून प्रत्येकाला 1 शेळी मोफत देण्याची योजना आखण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी शेती उद्योगावर भर देत शेळी व दुधाळ जनावरांच्या पूरक व्यवसायावर शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देण्याचे आवाहन ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करतांना श्री. केंदार यांनी केले. यावर चिंतन व मनन करण्याची आवश्यकता  त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेद्वारे शेळी गट व दुधाळ जनावरे वाटप कार्यक्रम ग्रामीण भागात राबविण्यात येत असून हा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राज्यात  राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपनीला ग्रामीण भागात  शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळणे आवश्यक असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी सांगितले. आधुनिक काळात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यासाठी या कार्यशाळेला अनन्यसाधारण महत्व आहे. नाशिक येथील शेतकरी उत्पादक कंपनीला कृषी सभापतींनी भेट देऊन तेथील कार्यपध्दती जाणून घ्यावी व त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना द्यावा, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेबाबत विस्तृत माहिती देताना दीपक झंवर यांनी या कंपनीचे सभासद झाल्यास त्यांचा निश्चितच शेतकऱ्यांना लाभ होईल, असे सांगितले. कंपनी ॲक्टनुसार सभासद होण्यासाठी सातबारा व आधार कार्ड आवश्यक आहे. त्यासोबत कंपनीच्या कार्यपध्दतीबाबत माहिती त्यांनी दिली.

‘सभापती आपल्या शिवारात’ या कार्यक्रमात क्षेत्रीय भेटी देऊन शेतकऱ्यांना या कंपनीबाबत माहिती देवून मार्गदर्शन करण्यात येईल, असे कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांनी सांगितले. कृषी क्षेत्राचे आरोग्य बिघडल्यामुळेच मानवाचे आरोग्य आधुनिक काळात बिघडले आहे, त्यामुळे विस्कळीत शेती व्यवसायास संजीवनी देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद व्हा. शेतकरी खरा शास्त्रज्ञ आहे, त्याला आर्थिक पाठबळ दिल्यास ते शक्य होईल. त्याबरोबर येथील मिरची, तांदूळ व संत्रा विदेशात जात आहे. शेतबांधावरच पॅकींगची व्यवस्था झाल्यास शेतकरी उद्योजकही होईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी कार्यशाळेबाबत विस्तृत माहिती दिली. एकीचे बळ कसे असते याविषयी माहिती देऊन शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद होण्याचे आवाहन केले. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही व कमी किमतीत बियाणे व खतांचा पुरवठा होईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र सहकार विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलींद आकरे, मार्गदर्शक अमिताभ मेश्राम, किशोर बोराटणे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रारंभी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचा प्रारंभ करण्यात आला.

या कार्यशाळेस जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी,  शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.