प्रशासकीयब्रेकिंग न्युज

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

आठवडा विशेष टीम―

सातारा दि.१६: प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून, संघर्षातून आणि कष्टातून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना धरणाची निर्मिती झाली आहे.  प्रकल्पग्रस्तांनी केलेला त्याग व संघर्ष कधीही विसरता येणार नाही,  त्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांना सातबारा  वितरणाचे वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी, घरे दिल्यामुळे कोयना धरणाची निर्मिती झाली आहे.  या निर्मितीमध्ये स्व. यशवंतराव चव्हाण, व स्व.बाळासाहेब देसाई यांचेही मोलाचे योगदान आहे. कोयना धरणाच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र प्रकाशमय झाला.  प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील.

मागील जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील काही गावे बाधित झाली आहेत.  या बाधित गावांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागा लवकरात लवकर शोधण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.   कोरोना संकटाच्या काळात शासनाने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर दिला होता. राज्याच्या विकासाला गती देण्यात आली असून  विकास कामे करीत असताना त्याचा दर्जा उत्तम राखावा, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोयना धरण दरवर्षी शंभर टक्के भरते.  यातून २  हजार मेगावॉट, वीज निर्मिती केली जाते.  याबरोबर सातारा व सांगली भागातील शेतीसाठी पाणी वापरले जाते, प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून धरणाची निर्मिती झाली आहे.  त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची भूमिका  सकारात्मक असल्याचे त्यांनी  सांगितले.

गृहराज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या.  कोयनानगर परिसरात पर्यटन वाढीसाठी विविध विकासकामे करण्यात येत आहेत. कोयना जलाशयात पर्यटकांसाठी नौका विहार सुरु करण्याबाबत प्रयत्न आहे.

यावेळी खासदार पाटील, माजी आमदार पाटणकर, डॉ. भारत पाटणकर यांनीही  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव गुप्ता यांनी केले.  या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी  कोयनानगर (चेमरी) येथील कोयनाप्रकल्प नूतनीकृत विश्रामगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button