प्रशासकीय

शेतीपूरक व्यवसाय, वन पर्यटनातून ‘शहानूर’ होणार उद्योगपूर्ण गाव

आठवडा विशेष टीम―

अकोला,दि.17(जिमाका)- शहानूर (ता. अकोट) हे आदिवासीबहुल गाव असून याठिकाणी शेतीपूरक व्यवसाय तसेच वनपर्यटन या व्यवसायांना चालना देऊन हे गाव उद्योगपूर्ण गाव म्हणून विकसित करण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी अकोट येथे दिले.

अकोट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात  ‘शहानूर उद्योगपूर्ण गाव’ संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपवनसंरक्षक अर्जुना के. आर., उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.कांतप्पा खोत, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी डी. एल. ठाकरे, तहसिलदार निलेश मडके, तालुका कृषी अधिकारी सुशांत शिंदे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता सचिन गवई, उपअभियंता राजू सुलतान, गटविकास अधिकारी, कृषी सेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले की, शहानूर हे आदिवासी बहुल गाव असून या ठिकाणी शेतकरी व मजुरांना शेती पूरक उद्योग व रोजगार निर्मिती होईल याकरीता नियोजन करा. त्यासाठी आधी गावातील कुटूंबनिहाय माहिती गोळा करुन त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. शेतामध्ये बहुपीक पद्धती विकसीत करण्यासाठी ठिंबक व तुषार सिंचन  सुविधा उपलब्ध करुन द्या. शेतीपूरक व्यवसायात मधुमक्षिकापालन, कुकुटपालन, मत्स्यपालन, बांबु लागवड व शेळी पालन इ. व्यवसायाला चालना द्यावी. त्यासाठी आदिवासी व कृषी विभागाने पुढाकार  घ्यावा. शासनाच्या योजनांचा लाभ गावकऱ्यांना मिळेल यासाठी प्रयत्न करावा.  वनक्षेत्र असल्याने पर्यटन व्यवसाय विकसीत करण्यासाठी ईको फ्रेन्डली आकर्षक इमारत, आदिवासी संस्कृती, नृत्य प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे उपक्रम राबवावे. त्यासाठी  नैसर्गिक गोलाकार रंगमंच तयार करावा. आदिवासी संस्कृती जतन करुन सुंदर व आदर्श गाव निर्मिती करावी. घरकुल योजनेअंतर्गत नविन घरे मंजूर करतेवेळी दर्शनी भागातील जागा व्यवसायाकरीता जागा राखीव ठेवावी. तसेच शाळा, खेळाचे मैदाने, व्यायाम शाळा इ. कामे मनरेगाच्या माध्यमातून पूर्ण करावे. शहानुर ग्रामस्थांना मनरेगा योजनेतून किमान 90 दिवस रोजगार उपलब्ध होईल यासाठी कार्यक्रम तयार करावा. रस्ते, शेततळे, वृक्षारोपण व रोपवाटिका विकसित करणे इ. बाबीचा समावेश करावा. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय निर्मितीकरीता प्रस्ताव  तयार करावा. शहानुर गावाचा विकास करुन उद्योगपूर्ण गाव ही संकल्पना पुर्णत्वास नेण्यासाठी सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button